देवदर्शनाच्या बहाण्याने एर्टिगा भाड्याने घेतली; कोयते घेऊन आरोपींचा अर्धा तास धिंगाणा, पोलीस कर्मचाऱ्याची धाडसी झेप
धाराशिव : एकतर्फी प्रेमातून तरुणीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथे घडला. दोन धारदार शस्त्रांसह आलेल्या चार आरोपींनी भरदुपारी तरुणीच्या घरात घुसून आई आणि बहिणीचा विरोध झुगारत तिला जबरदस्तीने एर्टिगा कारमधून पळवून नेले. मात्र, गावकऱ्यांची सतर्कता आणि पोलिसांच्या धाडसी पाठलागामुळे तब्बल ७० किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील बोर्डा गावात संबंधित तरुणी राहत होती. एकतर्फी प्रेमातून तिचे अपहरण करण्याचा कट आरोपींनी रचल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. त्यानुसार चार आरोपी एर्टिगा कारमधून दोन धारदार शस्त्रे घेऊन तरुणीच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश करत त्यांनी तरुणीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्या आई आणि बहिणीने आरोपींना जोरदार विरोध केला. मात्र, आरोपींनी त्यांचा विरोध झुगारून तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवले. या झटापटीत तरुणीच्या बहिणीच्या हाताला दुखापत झाली.
तरुणीला घेऊन आरोपींनी भरधाव वेगाने गावातून पलायन केले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी तातडीने आरोपींच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. तांदुळवाडी येथे गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आरोपींनी वाहन थेट शेतातून नेऊन पाठलाग करणाऱ्यांना चकवा दिला. त्यानंतर कळंब शहरातून लातूरच्या दिशेने गाडी वेगाने पळवण्यात आली. दरम्यान, पोलिसांनाही घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने पाठलाग सुरू केला.
७० किलोमीटरचा थरारक पाठलाग
आरोपींनी पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि ग्रामस्थांनी पाठलाग सोडला नाही. बोर्डा गावातून सुरू झालेला हा थरार तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास करत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरापर्यंत पोहोचला. या काळात आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
अखेर अंबाजोगाई परिसरातील दगडवाडी येथील खदानजवळ पोलिसांनी आरोपींच्या वाहनाला घेराव घातला. पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर आरोपींनी हातात कोयते घेऊन पोलिसांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. तब्बल अर्धा तास हा थरार सुरू होता. आरोपी शस्त्रांसह असल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.
पोलीस कर्मचाऱ्याची धाडसी झेप; आरोपीला पकडले
यावेळी पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत आरोपीला पकडण्यासाठी थेट झेप घेतली. आरोपीसोबत झालेल्या झटापटीत त्यांच्या कानाला दुखापत झाली. मात्र, त्यांनी धाडस दाखवत आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वाघमोडे यांना लहानपणापासून कुस्तीची आवड असून, कुस्तीतील डावपेचांचा वापर करत त्यांनी आरोपीला पकडल्याचे सांगितले. तरुणी आणि इतरांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने आपण क्षणाचाही विचार न करता झेप घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवदर्शनाच्या बहाण्याने घेतली होती गाडी भाड्याने
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली एर्टिगा कार आरोपींनी तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शनाला जायचे असल्याचे सांगून भाड्याने घेतली होती. मात्र, त्याच वाहनाचा वापर तरुणीच्या अपहरणासाठी करण्यात आला. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहने आडवी लावली असतानाही आरोपींनी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या थरारक पाठलागात वाहनाचेही नुकसान झाले.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, फरार आरोपीच्या भावांनी संबंधित आरोप फेटाळल्याचेही वृत्त आहे.
या संपूर्ण घटनेमुळे धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत खळबळ उडाली आहे. भरदिवसा घरात घुसून शस्त्रांच्या धाकावर तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न, ७० किलोमीटरचा पाठलाग आणि पोलिसांची धाडसी कारवाई या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. ग्रामस्थांची तत्परता आणि पोलिसांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून, तरुणी सुखरूप बचावली आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.




