सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात तीव्र विरोध होत असून, सोमवारी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मोजणी आणि मॅपिंगच्या कामाला विरोध करत कोनवडे येथे संतप्त शेतकऱ्यांनी मॅपिंग मशीन पेटवले, तर म्हसवे येथे अधिकाऱ्यांना विरोध करून माघारी पाठवले.
गारगोटी येथे शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा दिल्या. शेती हा आमच्या उदरनिर्वाहाचा आधार असून, विकासाच्या नावाखाली जमिनी हिरावून घेऊ नयेत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माहुली येथेही मोजणीला तीव्र विरोध झाला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात आलेल्या प्रशासनाच्या वाहनासमोर शेतकरी आडवे पडले. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आंदोलनस्थळी उपस्थिती लावली. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अखेर प्रशासनाला मोजणीचे काम थांबवून माघारी फिरावे लागले.
कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत आंदोलन तीव्र झाल्याने शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.




