कोरोना टेस्ट न करताच दोघांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ | वायफळे येथील प्रकार : तालुका आरोग्य विभागाच्या यादीत ‘घोळ’

0
4



तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांनी कुठेही कोरोनाची चाचणी केली नाही. तरीही तालुका आरोग्य विभागाच्या यादीत या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र कोठेही टेस्ट न करता या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाच कसा, असा सवाल व्यक्त होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघत आहेत.


      याबाबत माहिती अशी : तासगावच्या आरोग्य विभागाने दि. 16 मे रोजी जी यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये वायफळे येथील महेश मारुती नलवडे व प्रतिभा (प्रतीक्षा) राजाराम नलवडे हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे. ही यादी अपडेट झाल्यानंतर ती वायफळे आरोग्य केंद्रास आली. त्यानंतर यादीतील मोबाईल नंबरवरून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सबंधित दोघांशी संपर्क साधला. त्यावेळी मात्र धक्कादायक बाब समोर आली. 


      महेश नलवडे व प्रतिभा (प्रतीक्षा) नलवडे यांनी आम्ही कोरोनाची टेस्टच केली नाही. मग आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाच कसा, असा सवाल केला. दोघांच्या प्रश्नाने आरोग्य केंद्रातील कर्मचारीही गोंधळून गेले. यानंतर आरोग्य केंद्राने ज्यावेळी रेकॉर्ड तपासले त्यावेळी दोघांचे आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुने तपासणीस घेतलेच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दोघांचा अहवाल प्रलंबित असण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. मात्र तालुक्यावरून आलेल्या यादीत तर या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे म्हटल्याने सगळेच चक्रावून गेले.


      जर या दोघांनी आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुने दिले नाहीत तर मग तालुका आरोग्य विभागाला या दोघांचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर ही सगळी तंतोतंत माहिती गेलीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून हा गोंधळ सुरू आहे. मात्र नेमका काय घोळ झाला आहे, हे कोणालाच समजेना झालंय.


      दरम्यान, तालुका आरोग्य विभागाच्या या गलथानपणाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या चार दिवसांपासून महेश नलवडे व प्रतिभा (प्रतीक्षा) नलवडे यांना प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. त्यांना झालेल्या मानसिक त्रासाला जबाबदार कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवाय या दोघांना कोरोना झालाय, अशी अफवा गावभर पसरल्याने दोघांच्या कुटुंबियांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन टेस्ट न करताच या दोघांना पॉझिटिव्ह जाहीर करणाऱ्या यंत्रणेचे पोस्टमॉर्टेम व्हावे, अशी मागणी होत आहे.


*चौकशी झाली नाही तर असेच घोटाळे होतील : प्रतीक्षा नलवडे*


     दरम्यान, याबाबत प्रतीक्षा नलवडे हिच्याशी संपर्क साधला असता साप्ताहिक ‘जनतांडव’शी बोलताना ती म्हणाली, मी 15 जानेवारी 2021 रोजी वायफळे आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट केली होती. मला महाविद्यालयीन कामासाठी या टेस्टचा रिपोर्ट गरजेचा होता. त्यावेळी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यांनतर गेल्या चार महिन्यात मी कुठेही कोरोनाची टेस्ट केली नाही. तरीही तालुका आरोग्य विभागाच्या यादीत माझे नाव पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कसे आले, याचे आश्चर्य वाटत आहे. कोणतीही टेस्ट न करता पॉझिटिव्ह रिपोर्ट जाहीर करणे, ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी. जर याची चौकशी झाली नाही तर असेच घोटाळे होत राहतील.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here