जत : सद्यस्थितीत जत शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाने थैमान घातलेले असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर लस ही नागरिकांसाठी संजिवनी ठरत आहे. यासाठी लस उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने नियोजन करावे व जत शहर आणि ग्रामीण भागाकरिता विशेषत्वाने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष तथा एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच बसवराज पाटील यांनी केली आहे.
राज्यासह जत शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेला लसीचा तुटवडा दूर करण्याच्या संदर्भात बसवराज पाटील यांनी राज्य लसीकरण अधिकारी डॉ.दिलीप पाटील, सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दुडी यांना पत्र पाठवून लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठांसाठी तसेच 45 वर्षावरील अतिगंभीर आजार असणा-या व्यक्तींसाठी,1 एप्रिलपासून 45 वर्षावरील व्यक्तींचे तर 1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या टप्प्यानुसार ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील हजारो व्यक्तींचा लसीकरणाचा पहिला डोज पूर्ण झालेला आहे आणि दुसरा डोज घेण्याची मूदत निघण्याच्या मार्गावर आहे.
1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू होताच राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लस उपलब्ध नसल्याने जत तालुक्यातील अनेक केंद्र बंद करावी लागली. आरोग्य प्रशासनाने केंद्र जाहिर केल्यानंतरही दुस-या दिवशी तिथे लस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने त्रासलेल्या ज्येष्ठांना आल्यापावली परत जावे लागते. विनाकारण या केंद्रावरून त्या केंद्रावर लसीच्या शोधात त्यांना फिरावे लागत आहे. पहिला डोज झाला आणि दुसरा डोज घेण्याची तारीख पुढे जात असल्याने अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात प्रशासनाकडून मात्र कुठलिही आश्वासक माहिती दिली जात नसल्याने गोंधळ उडत आहे. संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या लसीसंदर्भातील ढिसाळ नियोजन आणि व्यवस्थापनामुळे आज सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याचा आरोपही सरपंच बसवराज पाटील यांनी केला. आज देशभरात महाराष्ट्र वगळता अन्य सर्व राज्यांमध्ये सुरळीत लसीकरण सुरू आहे.
त्यामुळे आतातरी राज्य सरकारने राज्यातील परिस्थिती लक्षात घेउन गांभीर्याने लसींचा पुरवठा त्याचे नियोजन व व्यवस्थापन करावे व राज्यातील जनतेला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी बसवराज पाटील यांनी केली आहे.








