जत तालुक्यातील हजारो वर्षे असलेला दुष्काळ. दूर व्हावा यासाठी पप्पा ( अप्पासाहेब काटकर) प्रचंड झटले…. 1983,86 सालापासून जत तालुक्यात शिवसेनेचे स्वतःचे टँकर आणि गावोगावी टाक्या उभ्या करण्यापासून काम केले. नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ताकारी म्हैसाळ योजनेचे महत्व पटवून दिले.1990 साली अभ्यासाला शिवसेना आमदारांची एक टीम आली. 93 ते 95 या काळात शिवसेनेने अधिकृत रीत्या या प्रश्नावर पुस्तिका प्रकाशित केल्या विधिमंडळ पक्षातर्फे त्याचे प्रकाशन केले आणि शिवसेना सत्तेवर आल्यानंतर या योजनेला मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.95 साली सत्ता आली तरीही अधिकारी आणि काही मंडळींनी ही योजना तांत्रिक दृष्ट्या शक्य होणार नाही असे मत मांडले.
त्याबद्दल दक्षिण जत तालुक्याचा प्रखर लढा उभा केला. ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उप जिल्हा प्रमुख बाबुराव दुधाळ यांच्या मदतीने देवनाळ या आमच्या गावातून लढा उभा केला. पुढे बिळुर येथेही मेळावा घेतला. जत तालुक्याचा सर्व वंचित भाग जागा केला. प्रसंगी अनेकांशी वैर घेतले. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीत पप्पांनी जत तालक्याची बाजू त्वेषाने मांडली. त्या मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष जी देसाई यांना भूमिका समजाऊन सांगितली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. सर्व वृत्तांत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानी घातला.आणि देवनाळ डाव्या उजव्या कालव्याच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठी प्रचंड लढाही उभा करावा लागला.
आज हे सांगताना सोपे वाटते. पण तो काळ खूप कठीण होता. जत तालुक्यातील अनेक वंचित गावे आणि तिथले नेतेही आंदोलनात उतरले. काळाने मात्र आपल्याच गावात आलेले पाणी पाहण्याची संधी आपासहेब काटकर आणि बाबुराव दुधाळ या देवनाळच्या सुपुत्रांना दिली नाही. सात वर्षांपूर्वी जत तालुक्यात पाणी पोहोचले तेव्हाच ते आनंदी झाले होते. सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन पोरांची ही लढाई आज पूर्ण झाली. त्यांच्या तालुक्यात पाणी आले होते पण गावात आले नव्हते. आज देवनाळ गावात पाणी आले.
पाण्याचे पूजन करण्याचे भाग्य आप्पासाहेब काटकर यांचे पुत्र शंभूराज आणि बाबुराव दुधाळ यांचे पुत्र बंटी यांना लाभले. कालव्याचे पाणी पाहून लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तसेच माझ्याही. कारण या साऱ्या बाबीची निवेदन लिहीत मी लहानाचा मोठा झालो. आज गावात पाणी आले. दुष्काळात इथल्या असंख्य पिढ्या खपल्या पण आमची पिढी भाग्याची. पित्याने आपल्या जन्मभूमीचे पांग फेडले हे मी अभिमानाने सांगू शकतो. दुष्काळाशी झुंजत हतबल होऊन मातीत मिसळलेल्या शेकडो पूर्वजांना अभिमान वाटला असेल आज आपल्या कुळात जन्माला आलेल्या पुत्राचा. प्रचंड मोठ्या शेत जमिनीची मालकी, ज्या घरात पिकलेले धान्य ठेवायला घराइतके मोठे पेव होते आणि दुष्काळात ज्यांच्या घरातून इतरांना धान्य दिले जात होते त्याच घरात जन्म झाला तेव्हा त्या वैभवाचा दुष्काळ आणि वाण्याची बिले भागवत नाश होत होत माझे वडील लहान वयात एक वर्ष वेठ बिगार म्हणून दोन जोड कपडे आणि 50 रुपयाला राबले. पितृ छत्र बालपणी हरवल्याने आजी आणि काकांनी सारी जमीन विकून गाव सोडले. त्या गावात पप्पा परतले ते स्वतःचे नाव कमावून. 82-83 साल असेल. मी जेमतेम पाच सहा वर्षांचा. तेव्हा दुसऱ्याच्या ( दुधाळ यांच्या) दरात मारुतीच्या देवळा समोर मी त्यांच्यासोबत चांदण्यात झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी उजेडात आपला वाडा, हातून गेलेली शेती पप्पांनी दाखवली. देवनाळ ते जत साडे पाच किलोमीटर चालत परतून एस टी ने घरी आलो होतो. पुढे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून पप्पांनी जत तालुक्यात उघड्या डोंगरांवर झाडे लावण्याची मोहीम राबवली.
तेव्हा जीपने गाडीभर झाडे घेऊन पण आलो होतो. मला पप्पा म्हणाले, या गावातून मी मजूर म्हणून सांगलीला गेलो होतो पण आपल्याला या गावात पाणी आणायचं आहे….मध्यंतरी ते आजारी होते पण जतचा पाणी प्रश्न रखडला याचे त्यांना दुःख होते. उमदितून सुरू झालेल्या आंदोलनात मीही उतरलो. मंत्रालयात गिरीश महाजन यांच्यासमोर बैठकीत तालुक्याची भूमिका ठामपणे मांडली. कार्यकर्त्यांना दाबण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.32 कोटीचा तुटपुंजा पण निधी दिला. ते यश उमदी करांचे होते पण त्यासाठी मीही माझी बौद्धिक शक्ती पणाला लावली होती. परतलो तेव्हा पप्पांनी पाठ थोपटली.पाणी लवकरच येणार असे ते बोलले. पण ते पहायची त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. ही त्यांची जिद्द आज पूर्ण झाली….. पप्पा तुम्ही ही लढाई जिंकली….. आनंद मात्र साजरा आम्ही करतोय…. आता दुष्काळ हटणार….. इथल्या प्रत्येक घरातला पुढचा पिढीचा प्रतिनिधी सुकाळी भागाचा म्हणला जाणार… फक्त याच गावातील नव्हे प्रत्येक गावातील…. आज दुपारी पाणी पूजनासाठी आमदार विक्रम दादा सावंत ही गावात आले होते. गावच्या लोकांनी त्यांना अप्पासाहेब काटकर,बाबुराव दुधाळ यांच्या योगदानाची माहिती दिली. आमदारांनीही आठवणींना उजाळा दिला. अनेक गावकरी आपल्या पाहुण्यांना पाण्याचे व्हिडिओ पाठवून आनंद व्यक्त करत होते. तुमची आठवण सांगत होते. पप्पा तुम्हाला विनम्र अभिवादन.
– शिवराज काटकर,पत्रकाराचे नेते









