जत,संकेत टाइम्स : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जत तालुक्यातील डफळापूर येथील श्रीपती शुगर या साखर कारखान्याचा ऊसतोडणी वाहतूक कराराची सुरूवात करण्यात आली.राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्याचे स्वप्न होते.तो कारखाना आता आकारास येत आहे. कारखान्याचे काम गतीने सुरू आहे. येत्या नोव्हेंबरला पहिले गाळप करण्यात येणार आहे.या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा व तरुणांना रोजगार मिळावा असा त्यांचा उद्देश होता.
त्यानुसार आ.मोहनशेठ कदम, राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम,आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची गतीने उभारणी सुरू आहे.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की,तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे हे स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांचे स्वप्न होते.त्यानुसार शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी दोन कारखाने मंजूर केले आहेत.
2500 मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या या कारखान्याचा येत्या नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे.अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ऊसतोडणी वाहतूक करार केले आहेत.यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी करावी.तसेच या कारखान्यात स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे.उसाला चांगला दर देऊन या भागाचा विकास नक्की करू असा विश्वास आमदार सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड म्हणाले की,श्रीपती शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळणार आहे.कारखाना जवळ असल्याने वाहतूक,वजन,बिले यासंदर्भात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी करावी.
यावेळी जनरल मॅनेजर महेश जोशी,शेती अधिकारी धरिगोड,इलेक्ट्रिकल मॅनेजर आनंदा कदम,राजेंद्र जेऊर व ऊस तोडणी मुकादम उपस्थित होते.
डफळापूर येथील श्रीपती शुगर या कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक करार करण्यात आले.








