जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा
उमदी : जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. तालुक्यात वर्षभरापूर्वी अनेक ठिकाणचे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, झालेल्या मोठ्या पावसामुळे व कंत्राटदारांनी काम करताना रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे झाली. मात्र, एक वर्षाचा कालावधी लोटला तरी रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात येणाऱ्या साईडपट्ट्यांची कामे अजूनही झाली नाहीत.
जीर्ण तारा व खांबामुळे धोका
संख : संख तालुक्यात व शहरात जुन्या वसाहती अनेक ठिकाणी विद्युत खांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवलेला पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबामधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत अशी मागणी
होत आहे.
वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त
करजगी : करजगी परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी पासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसापासून तर भर दुपारी उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे सकाळच्या प्रहरीच कामे आटोपण्याचा शेतकरी वर्गाचा कल दिसून येत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा राहत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली
जत : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी जत तालुक्यात कोरोनाचे दीड शतकावर रुग्ण निघाले। तालुक्यात आजपर्यंत 4,200 पेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधित निघाल्याने शहरी व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.