जत : जत तालुक्यातील एखाद्या खेड्यात एखाद्यास कोरोनाचे निदान झाले आणि त्याला ऑक्सिजनची गरज भासली, तर अनेक कि.मी. अंतर प्रवास करून शहर गाठावे लागत आहे. अशावेळी अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी 90 वरून 60 वर येते. अनेक रुग्ण रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत असतात आणि त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मग रुग्ण वाचणार कसा? त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनावरील उपचाराची सुविधा वाढविण्याची गरज असल्याची अपेक्षा फिजिशियन असोसिएशनने व्यक्त केली.
तालुक्यात शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात बुधवारी उच्चांकी 73 रुग्णांची वाढ झाली. एकूण सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना सरळ शहरात रेफर केले जात असल्याची परिस्थिती आहे. रेफर करताना शहरात बेड उपलब्ध होईल की नाही, याचा कोणताही विचार केला जात नाही. ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णाची प्रकृती शहर गाठेपर्यंत आणखी खालावते.
त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले तरी फारसा उपयोग होत नाही. केंद्रीय पथकानेही ग्रामीण भागातून रेफर होणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीवर बोट ठेवले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळेल, अशी व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.