जत,संकेत टाइम्स : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी मानला जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतून जत तालुक्याला 2016 ते 2021 या पाच वर्षात केंद्रातील मोदी सरकारकडून 7 हजार 111 घरकूलासाठी 100 कोटी एवढा भरघोस निधी मिळाल्याने यावर्षीच्या अखेर पर्यंत ग्रामीण भागातील गोरगरीबांना हक्काच्या घराचे स्वप्न पुर्ण होणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जत तालुका अध्यक्ष तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बसवराज पाटील पुढे म्हणाले की,
देशातील अनेक वर्षापासून स्व:ताचे घर नसलेल्या कुंटुबांना हक्काचे घर मिळावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास ही महत्वकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे.या योजनेतून जत तालुक्याला पाच वर्षात 100 कोटीचा निधी मिळाला आहे. या योजनेतून तालुक्यातील 116 गावातील 7 हजार 111 कुंटुंबांना घरकुल मिळणार आहे.
2016/17 या आर्थिक वर्षात 891 घरकूलासाठी 12 कोटी 11 लाख 76 हजार,2017/18 या वर्षात 745 घरकूलसाठी 10 कोटी 28 लाख 10 हजार,2018/19 या वर्षात 277 घरकूलसाठी 3 कोटी 82 लाख 26 हजार,2019/20 या वर्षात 2219 घरकूलसाठी 30 कोटी 62 लाख 22 हजार,2020/21 या वर्षात 2939 घरकूलसाठी 40 कोटी 55 लाख 82 हजार असा 97 कोटी 40 लाख 16 इतका निधी पंचायत समितीला उपलब्ध झाला आहे. यातून बहुतांश घरे पुर्ण झाली आहेत,तर काही पुर्णत्वाकडे आहेत.यंदाच्या वर्षातील घरकुल लाभार्थ्यांची प्रक्रिया अतिंम टप्यात आहे.
हा निधी तालुक्याला मिळावा यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य,संरपच यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे, असेही पाटील म्हणाले,
जत पंचायत समितीला कर्मचारी वाढवावेत
जत पंचायत समिती मधील घरकूल विभागात फक्त तीनच कर्मचारी कार्यरत आहेत.सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुले उपलब्ध झाल्याने कर्मचाऱ्यावर जबाबदारी वाढली आहे,घरकुल प्रक्रियेला मर्यादा पडत आहेत,यात गती आणण्यासाठी या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी,अशी मागणीही पाटील यांनी केली.
केंद्राची योजना,आघाडी शासनाचा संबध नाही
प्रधानमंत्री आवास ही महत्वाकांक्षी योजना सर्वांना हक्काचे घर मिळावे,यासाठी केंद्र शासन राबवत आहे,यात राज्यातील महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नाही,ही योजना थेट केंद्र सरकारची आहे,अशीही माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मिलिंदबापू पाटील, सरपंच परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष राजाराम जावीर, भाजपा युवा मोर्चा अल्पसंख्याक कार्याध्यक्ष आयुब सय्यद, बसर्गी ग्रा.पं.सदस्य हणमंतराव पटेद, संगय्या स्वामी, सुनिल आरगोडी, अशोक स्वामी यांच्या सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.












