मिरज : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या २१ मार्च रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरोगामी सेवा मंडळाच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या सत्ताधारी संचालकांनी सभासद हितासाठी घेतलेल्या पोटनियम दुरुस्तीच्या विषयांमुळे विरोधकांचा पोटशूळ उठला असून हतबल व सैरभैर झालेल्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केली असल्याचे मत शिक्षक समितीचे नेते धरेप्पा कट्टीमनी यांनी व्यक्त केले. जत तालुक्यातील सभासद व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी तालुका नेते सभासद व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
ते म्हणाले, शिक्षक समितीच्या सत्ताकाळात शिक्षक बँकेने बॅंकिंग क्षेत्रातील प्रचंड स्पर्धेला तोंड देत नेत्रदीपक प्रगती साधली आहे.त्यामुळेच सभासदांनी पुरोगामी सेवा मंडळाच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या हातात दुसऱ्यांदा कारभार सोपविला आहे. त्या विश्वासाला पात्र राहत विद्यमान सत्ताधारी संचालकांनी सुरू केलेली मृत सभासद संजीवनी योजना,स्टॅंप ड्युटी माफ करणे, कर्जावरील व्याजदरात दोनदा केलेली कपात, डीसीपीएस धारकांच्या मदतीसाठी केलेली वाढीव मदत इ. सभासद हिताच्या निर्णयांमुळे शिक्षक समिती आगामी निवडणुकीत बाजी मारणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले,कोरोना संकटामुळे संपूर्ण देशभरातील सर्व सहकारी बँकांना लाभांश वाटपास रिझर्व बँकेने मनाई केलेली आहे. अशा परिस्थितीत सभासदांना दिलासा देण्यासाठीच कायम ठेवी परत देण्याचा विषय सर्वसाधारण सभेतील विषयपत्रिकेत घेण्यात आला आहे. तसेच नव्याने कर्ज घेणाऱ्या सभासदाने जर पंचवीस लाख रुपये कर्ज घेतले तर सध्या त्याची सहा टक्के प्रमाणे दीड लाख रुपये शेअर्स कपात केली जाते.त्यामध्ये पोटनियम दुरुस्तीनंतर पाच टक्के शेअर्स कपातीनुसार पंचवीस हजार रुपये शेअर्स कपात कमी होणार आहे. त्यामुळे सभासदांचा दीर्घकालीन फायदा होणार असल्याने विरोधकांच्या भूलथापांना तो बळी पडणार नाही.
ते पुढे म्हणाले की, डीसीपीएसधारक सभासदांना वाढीव मदत करण्याच्या विषयामुळे नवीन सभासदांमध्येही या निर्णयाबद्दल समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे विरोधकांना कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने सभासदांचा बुद्धीभेद करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.
विरोधकांच्या सत्ताकाळात वाढलेला कर्जाचा व्याजदर पुरोगामी सेवा मंडळाच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या सत्ताकाळात टप्प्याटप्प्याने कमी केला गेला आहे हा इतिहास आहे.आगामी काळात कर्जावरील व्याजदर एक अंकी करण्याचा संकल्प नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लवकरच सिद्धीस जाणार असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून ते पुरते हतबल झाले असल्याचा घणाघात यावेळी बोलताना धरेप्पा कट्टीमनी यांनी केला.









