जत,संकेत टाइम्स : कोसारी ता.जत येथील ग्रामपंचायत ते गुळवंचीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका राजकीय नेत्याकडूनही अतिक्रमण करून रस्ता बंद केला होता.तो रस्ता खुला करावा या मागणीसाठी रासपचे तालुकाध्यक्ष किसन टेंगले हे गेल्या दोन दिवसापासून बेमुदत उपोषणास बसले होते.
बुधवारी पहिल्या दिवशी तालुका स्तरीय वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करून देऊ असे आश्वासन दिले होते.रस्ता खुला करण्यासाठी पोलीस फाटाही आणण्यात आला होता.
मात्र ऐनवेळी फोनाफोनी झाल्याने अधिकाऱ्यांनी निर्णय बदलत दोन दिवसानंतर बघू असे उपोषण कर्ते टेंगले व नागरिकांना सांगितले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले.जोपर्यत अतिक्रमण काढून रस्ता खुला होत नाही तोपर्यत उपोषण मागे घेणार नसल्याचे जाहीर केले.अखेर शुक्रवारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.पांडूरंग चव्हाण,ग्रामसेवक संजय भाते,संरपच तानाजी भिसले व अन्य अधिकाऱ्यांनी उपोषण कर्ते टेंगले व ग्रामस्थाची भेट घेत जेसीबी लावून संबधित बंद रस्ता खुला केला.त्यानंतर टेंगले यांनी उपोषण सोडले.
गेल्या अनेक दिवसापासून थेट ग्रामपंचायतीचा रस्ता बंद करण्याचा प्रकार झाला होता.ग्रामपंचायत,पंचायत समितीकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही अतिक्रमण काढण्यात आले नव्हते.तेथून जाणाऱ्या नागरिकांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत होते.अखेर वैतागलेले टेंगले व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
यावेळी संभाजी टेंगले, विकास महारनुर, नानासो लिगाडे, शौकत मणेर, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे जत तालुकाध्यक्ष रावसाहेब राजाराम हेगडे, नवनाथ टेंगले, तानाजी टेंगले, महेश तोरवे, शंकर तोरवे माजी सैनिक संघटना, हिरालाल मणेर जनार्दन कोळी, विशाल सोहनी, मोहन हाक्के उपस्थित होते.
संकेत टाइम्सचे आभार
कोसारी ता.जत येथील या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात किसन टेंगले यांच्या प्रत्येक तक्रारीची वस्तुनिष्ठ बातमी छापली होती.बुधवारपासून उपोषणास बसलेले टेंगले यांच्या तक्रारीची सत्यस्थित परिस्थिती मांडली होती.या यशस्वी आंदोलनात जनतेचा आवाज म्हणून संकेत टाइम्सनेही महत्वाची भूमिका बजावली. याबद्दल किसन टेंगले व ग्रामस्थांनी आभार मानले.
अनेक गावात रस्ते गायब
जत तालुक्यात अनेक गावात असे रस्ते,बोळ,सार्वजनिक जागा काही नागरिक,समाजसेवेचा आव आणणाऱ्या लोक प्रतिनिधीनी बळकावल्या आहेत.अनेक गावातील तक्रारीही पंचायत समितीकडे दाखल आहेत.त्यावरही कोसारी प्रमाणे विशेष मोहिम राबवून रस्ते खुले करावेत अशी मागणी होत आहे.
कोसारी ता.जत येथील अतिक्रमण केलेला रस्ता खुला केला.टेंगले यांची अधिकाऱ्यांनी सरबत पाजून उपोषण संपविले.










