जत,संकेत टाइम्स : आज महिला दिन आहे.एकीकडे महिलादिन साजरा करत महिला संरक्षणाची वल्गना करणाऱ्या जत नगरपरिषदेला गेल्या आठ वर्षात एकही महिला स्वच्छतागृह उभारता आले नाही,हे पदाधिकारी,अधिकाऱ्यांचे अपयश आहे.
जत शहराची लोकसंख्या 60 हजाराच्या घरात आहे.त्याचबरोबर तालुक्यातील अनेक भागातून विविध कामासाठी शेकडो महिला दररोज जतेत येतात.
त्याशिवाय शहरात अनेक महिला आठवडा बाजारात विविध साहित्य,फळे,भाजीपाला विक्री करतात.या महिलासाठी शहरात नगरपरिषदेला गेल्या आठ वर्षात एकही स्वच्छतागृह बांधण्याची गरज वाटली नाही हे विशेष..शहरात एसटी स्टँडमध्ये महिलासाठी स्वच्छतागृह आहे.मात्र तेथे कधीच स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी सुटली आहे.
महिलांचे किंवा महिलांना आवश्यक स्वच्छतागृह सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वेळा आवाज उठवला जातो.सामाजिक कार्यकर्ते एनजीओ काम करतात. पण जनतेतून निवडून आलेल्या 50 टक्के महिला नगरपरिषदेत लोकप्रतिनिधींत्व करत असतानाही शहरात एक स्वच्छ स्वच्छतागृह मिळावे म्हणून देखील झगडावं लागतं, हे चित्र आहे.
महिला दिनाच्या औचित्यावर सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.तालुक्याचे मुख्य शहर असतानाही इथेच जर महिलांना स्वछतागृहांची योग्य सुविधा नसेल तर जनतेचे काय हाल असतील असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना काळात तर स्वच्छतागृह अस्वच्छ असेल तर अजून जास्त समस्या होऊ शकतील. शहरात स्वच्छतेचा डांगोरा पिटत,मोठ मोठे पोस्टर लावणाऱ्या नगरपरिषदेकडून
सार्वजनिक
स्वच्छतागृहांची योग्य साफ सफाई होत नाही आणि महिलासाठी स्वच्छतागृह बांधा हे गेल्या आठ वर्षापासून सांगण्याची वेळ महिलावर यावी हे दुर्दैवी आहे.
आमदार सौभाग्यवतीच्या मागणीलाही नगरपरिषदेची केराची टोपली
सन 2018 मध्ये महिलदिनी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या सौभाग्यवती वर्षा सांवत यांनी महिला नेत्या मीनल सांवत यांच्यासह शहरातील महिला शिष्टमंडळासह नगरपरिषदेला महिला स्वच्छतागृह उभारण्याचे निवेदन देत मागणी केली होती.गेल्या तीन वर्षात नगरपरिषदेकडून एकही स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नाही.महिला नगराध्यक्ष असतानाही महिलासाठी स्वच्छतागृह उभारण्यात अपयश आले आहे.








