काही काळ खाली आलेला कोरोनाचा आलेख आता पुन्हा वर जात आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दुपटीने कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्याची उपराजधानी नागपूर, अमरावती, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यामधील परिस्थिती अतिशय बिकट होऊ लागली आहे. रुग्णाच्या वाढीचा सर्वाधिक दर याच जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणूनच प्रशासनाने यापैकी काही जिल्ह्यात मिनी लॉक डाऊन तर काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे. मुंबईच्या आयुक्तांनीही मुंबईत कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे.
राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होतोय याला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यातील बहुतेक व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांना कोरोनाचा विसर पडला. लस आली या भ्रमात राहिल्याने नागरिक कोरोनाची त्रिसूत्री विसरून गेले. कोरोनाची लस जरी आली तरी ती सर्वांपर्यंत पोहचली नाही.
लसीकरणाच्या आशेवर सर्वसामान्य नागरिकांनी जर निष्काळजीपणा केला तर तो खूप महागात पडेल. कोरोनाचा दर कमी झाला पण कोरोना हद्दपार झालेला नाही याचा नागरिकांना विसर पडला म्हणूनच नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्क हनुवटीवर आला. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सॅनिटायजरचा नागरिकांना विसर पडला त्याचा परिणाम म्हणून कोरोना पुन्हा आक्रमक झाला. आतातरी नागरिकांनी खबरदारी बाळगावी. सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्यविधी याला नगरिकांनी गर्दी करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टन्स ( एस एम एस ) या त्रिसूत्रीचा वापर करावा. सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. लस आली म्हणजे कोरोना गेला या भ्रमात नागरिकांनी राहू नये. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर स्वयंशिस्तीला पर्याय नाही.
स्वयंशिस्त हीच कोरोनवरील लस आहे हे नागरिकांनी विसरू नये. जर नागरिकांना स्वयंशिस्त आणि सॅनियजर, मास्क आणि सोशल डिस्टन्स (एस एम एस ) या त्रिसूत्रीचा विसर पडला तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. साधारणपणे एक वर्षापूर्वी आपली काय परिस्थिती होती याचा विचार करुनच नागरिकांनी खबरदारी घेत दैनंदिन व्यवहार करावेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊनला सुरवात झाली तेंव्हा सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल झाले ते पुन्हा होऊ द्यायचे नसेल तर नागरिकांना स्वयंशिस्त पाळावीच लागेल. पुन्हा एकदा लॉकडाऊन कोणालाच परवडणारे नाही, हे लक्षात घेऊनच सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५