सांगली : कोरोनाला लवकर मात देण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घ्या, कोरोना लस सुरक्षित आहे. कोरोनाची लस घेवून कोरोना रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. या देशकार्याला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज येथे केले.
कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू असून आज पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल) येथे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी ते म्हणाले, लसीकरणासाठी ज्यावेळी आपणास दिनांक व वेळेबाबतचा संदेश येईल किंवा आरोग्य यंत्रणेकडून लसीकरणाबाबत कळविण्यात येईल, त्यावेळी आपण लसीकरण केंद्रावर येवून कोरोना लसीकरण करुन घ्यावे. कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात येत असलेली कोरोना लस सुरक्षित असून कोणतीही भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहूल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) रणजितसिंह जाधव, शिराळा गट विकास अधिकारी अनिल बागल, अतिरिक्त वित्त व लेखाधिकारी राहूल कदम, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
जि.प अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले.