सांगली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी सर्व जिल्हा वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,
महाराष्ट्र राज्य कृषि क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषि पंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषि पंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. कृषि ग्राहकांना दिवसा अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणीही करण्यात येणार असून याकरीता स्वतंत्र ऑनलाईन लँड बँक पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी ही योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी.वारणा प्रकल्प व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावण्यात आलेले असून उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी पुनर्वसन विशेष मोहिमेंतर्गत वसाहत निहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या शिबीरांमध्ये प्राप्त अर्जावर तात्काळ निर्णय घेतला जात असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. तसेच 31 पैकी 8 वसाहतीमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्या असून उर्वरित पुनर्वसित वसाहतींसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर प्रगतीपथावर आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यातील 610 खातेदारांसाठी निर्वाह भत्ता वाटपासाठी 4 कोटी 36 लाख रूपयांहून अधिक निधी प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
जून ते ऑक्टोबर 2020 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये मयत, जखमी, क्षतीग्रस्त घर / गोठा पडझड, मयत पशु, शेतीपीक नुकसान यासाठी 26 कोटी 10 लाख 68 हजार रूपये रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली. त्यापैकी शेतीपिकाची 23 कोटी 60 लाख रूपये रक्कम 49 हजार 720 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीतील शेतीपिक नुकसानीसाठी 26 कोटी 60 लाख रूपये रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली असून लाभार्थ्यांना त्याचे वाटप सुरू असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 81 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. यापैकी जवळपास 80 हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 473 कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत. याप्रमाणेच जुलै व ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत पीक कर्जमाफी दिली.
सांगली जिल्ह्यातील 27 हजार 550 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 136 कोटी 81 लाख रूपये रक्कम वर्ग करून पूरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या महामारीवर उपाय करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी लसींचा शोध लागला. भारतातही कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसींना मान्यता मिळाली. 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरूवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांना सेवा दिली अशा आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. लसीकरण सुरू असले तरी कोरोना संपलेला नाही हे लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी. हात धुणे, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचा वापर पुढील काळातही काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पाण्याचा वापर नियोजनबध्द झाला पाहिजे यासाठी राज्य शासनाचा कटाक्ष आहे. राज्यातील जलसंपदेचा उपयोग करत धरण, बंधारे, तलावांच्या माध्यमातून राज्याने शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी नेण्याचे काम केले असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्यातील काही भागाला नेहमीच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. यासाठी विविध योजना, प्रकल्पांच्या माध्यमातून येत्या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करत या भागातही पाणी नेण्याचे काम होईल. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि चिंतामुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून लोकाभिमुख आणि गतीमान प्रशासनासाठी जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा निश्चित पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आजच्या संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक विभाग, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, जेलकैदी पथक वाहन, बाँबशोधक पथक, निर्भया पथक, दामिनी पथक, फॉरेन्सीक लॅब पथक, आरसीपी पथक, सिव्हील हॉस्पिटल रूग्णवाहिका आदिंसह पत्रकार दीपक चव्हाण यांचा माझी वसुंधरा अभियानावर आधारित संदेश देणारा शोले स्टाईल चित्ररथाचाही समावेश होता.
प्रारंभी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर त्यांच्याहस्ते वीरमातांना ताम्रपट वितरण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या पोलीस, क्रीडा, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, कोरोना योध्दा यांना उत्कृष्ट कामगिरीबध्दल गौरविण्यात आले.
एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य पुरस्कार भारती हॉस्पीटल सांगली आणि वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांना वितरीत करण्यात आला.
या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.