आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘112’ हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
जी.पी.एस. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीवर आधारित ही सेवा असेल.
नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर यापूर्वीचा ‘100’ हा क्रमांक बंद करण्यात येणार आहे.
नव्या क्रमांकामुळे एखाद्या नागरिकाने मदतीसाठी दूरध्वनी केल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होईल तसेच पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी (रिस्पॉन्स टाइम) आणखी कमी होईल.
यापूर्वी नागरिक तक्रार करण्यासाठी पोलिसांच्या ‘100’ क्रमांकावर संपर्क साधायचे.
आता नागरिकांना ‘112’ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन सेवांसाठी ‘112’ हाच हेल्पलाइन क्रमांक असेल.
एखाद्या नागरिकाने ‘112’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो दूरध्वनी मुंबई किंवा नागपूर येथील कॉल सेंटरमध्ये जाईल.
तेथील प्रतिनिधी तक्रारदाराबरोबर संवाद साधतील.ही बहुभाषिक सेवा असल्यामुळे तक्रारदाराला भाषिक अडचण येणार नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.