थोर क्रांतिकारक नेते आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस

0
3



पृथ्वीच्या पाठीवर संपूर्ण विश्वात या भारतभूमीला नवरत्नांची खान समजली जाते.या खाणीत अनेक शूररत्नांनी जन्म घेऊन या भारताला ब्रिटिश शृंखलेच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.त्यांच्या महान कार्याने त्यांचे नाव विश्वासाच्या कान्याकोपर्यात गाजले.युगानुयुगे मनुष्य त्यांचे कार्य स्मरण करून त्यांचे आदर्श जीवनात उतरवतील.आजवर या भारतभूमीत जे शूररत्न होऊन गेले.त्यामध्ये  

सुभाषबाबूंचे नाव अग्रटोकावर आहे.सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३-जानेवारी-१८९७ रोजी कटक या ठीकाणी झाला.जानकीदास व प्रभावतीदेवी यांच्या पोटी एका तेजस्वी सूर्यदीपाचा अरूणोदय झाला.सुभाष बाबूंचा शालेय जीवनापासून देशभक्तीकडे ओढा होता.सुभाष बाबूंचे वडील जानकीनाथ बोस हे बंगालमधील कटक येथील नामवंत वकील होते.गंमत सांगायची म्हणजे सुभाष बाबूना एकूण १३ भावंडे होती.अपार बुद्धीमता,प्रखर जिज्ञासा,अदम्य जीवननिष्ठा,धगधगीत वैराग्य यांनी शोभून दिसणारे सुभाषबाबु बोस घराण्यातील नववे अपत्य होते.त्यांना एकूण सहा भाऊ व सहा बहीणी होत्या.महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासून इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा देण्याचे स्वप्न ते पाहू लागले.कलकत्ता विद्यापीठातून पदवी संपादन केल्या नंतर सुभाषबाबु वडीलांच्या इच्छेनुसार आय.सी.एस.होण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले.त्याठीकाणी त्यांनी आय.सी.एस.च्या परिक्षेत उत्कृष्ट यश मिळविले.या परिक्षेसाठी त्यांना अवघा आठ महीन्यांचा कालावधी मिळाला होता.इतका कमी कालावधी मिळूनही ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.सुभाषबाबु काही मोठे झाल्यावर नेताजी झाले नाहीत,तर काॕलेजात असल्यापासूनच त्यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व स्विकारले.अन्याय व अवमान या दोन गोष्टींची त्यांना फार चीड होती.लहानपणीच त्यांनी या विरूध्द बंड पुकारले.इंग्लंडहून भारतात परत आल्यावर सनदी अधिकारी म्हणून सुभाषबाबुनी सरकारी नौकरीत प्रवेश केला.परंतु थोड्याच दिवसात म.गांधीनी इंग्रज सत्तेच्या विरोधात असहकार चळवळ सुरु केली.या चळवळीतील एक कार्यक्रम सरकारी नौकरीचा त्याग करणे असा होता.म.गांधीच्या आव्हानला प्रतिसाद देवून सुभाषचंद्र बोस यांनी २२-एप्रिल-१९२१ रोजी अत्यंत मानाच्या जागेचा त्याग करुन स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली.स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या नौकरीचा राजीनामा देणारे ते पहीले आय.सी.एस.अधिकारी होते.

एक वेळी तरआय.सी.एस.ची सनद स्वीकारून ब्रिटिशांच गुलाम बनावं की कोणतीही प्रतिष्ठा न मिळवता स्वतःचे जीवन देशसेवेच्या चरणी अर्पित करावं,यामुळे त्यांच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती.तेव्हा ते आपल्या एका मिञाला पञाद्वारे म्हणाले होते,”कर्तव्याच्या हाकेला ओ देऊन,दीड वर्षापूर्वी मी माझी जीवननौका प्राप्त परिस्थितीच्या लाटांवर स्वार केली होती आणि माझी ही जीवननौका अशा एका मुक्कामापर्यंत पोहोचली होती की,तिथे मी थांबलो असतो,तर मला कशाचीच ददात जाणवली नसती.सत्ता,संपत्ती,वैभव,अधिकार मी म्हणेल ते नुसत्या इशार्यासरशी माझ्या पायाशी लोळण घेत पडले असते.”म्हणून सुभाषबाबु विषयी म्हणावे वाटते,”तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर,तु तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या.”गांधीजींच्या तडजोडीच्या भुमिकेला सुभाषबाबुनी अनेक वेळा उघडपणे विरोध केला.सन-१९३८ मध्ये हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली.त्यावेळी पासून काँग्रेस मधील अनेक नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले.गांधीजी  सोबत तर त्यांचे तीव्र मतभेद झाले.१९३९ च्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांनी गांधी गटाच्या पट्टाभी सीतारामय्या यांना प्रचंड मतानी पराभूत केले.यावरून सुभाषचंद्र बोस कीती लोकप्रिय होते हे दिसुन येते.त्यामुळे म.गांधी व इतर काँग्रेसचे नेते दुखावल्या गेले.म.गांधीनाही आपली लोकप्रियता कमी होते की काय असे वाटू लागले.त्यांना सुभाषबाबुंचे नेतृत्व नकोसे वाटू लागले.म्हणून काँग्रेसने सुभाषबाबुंशी असहकार पुकारला.त्यामुळे सुभाषबाबुनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.त्यानंतर त्यांनी १९३९ ला ‘फाॕरवर्ड ब्लाॕक’हा स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला.दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर काँग्रेसने इंग्रज सरकार विरुध्द तीव्र आंदोलन सुरू करावे असा आग्रह सुभाषबाबुनी धरला.त्यांच्या या भुमिकेमुळे इंग्रज सरकारने त्यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक केली.पूढे त्यांची कैदेतून सुटका झाली, परंतु त्यांना त्यांच्या घरातच नजर कैदेत ठेवण्यात आल.या नजर कैदेतून नेताजी १७-जानेवारी-१९४१ रोजी अत्यंत शिताफीने वेशांतर करून विस्मयकारकरित्या नजर कैदेतून निसटले.वेगवेगळी नावे धारण करून अफगाणिस्तानातून जर्मनीला गेले.तेथे बर्लिन नभोवाणीवरून भारतीय जनतेला उद्देशून त्यांनी भाषणे केली आणि ब्रिटिशाविरूध्द सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले.नेताजींनी हिटलरसह काही प्रमुख जर्मन नेत्यांच्या भेटी घेतल्या.जर्मनीत त्यांनी ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग ‘या नावाची संघटना स्थापन केली.जर्मनीत भारतीय स्वातंत्र्यासाठी आपणास काही भरीव स्वरूपाची कृती करता येणार नाही,असे लक्षात आल्यावर सुभाषबाबु जर्मनीहून एका पाणबुडीने जपानला गेले.त्या ठीकाणी रासबिहारी बोस यांनी युद्धात जपानच्या हाती सापडलेल्या भारतीय युद्धकैद्यांच्या मदतीने ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली होती.रासबिहारी बोस यांच्या विनंती वरून सुभाषबाबुनी आझाद हिंद सेनेचे ४-जुलै-१९४३ रोजी नेतृत्व स्विकारले.सुभाषचंद्र बोस यांनी २१-आॕक्टोबर-१९४३रोजी सिंगापूर येथे हिंदुस्थानाचे हंगामी सरकार स्थापन केले.या सरकारला जर्मन,जपान,इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली.भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषबाबुने नारा दिला.”तुम मुझे खुन दो,मै तुम्हे आझादी दूँगा”.आझाद हिंद सेनेने नेञदीपक यश संपादन करत अंदमान व निकोबार बेटे जिंकली.पुढे काही दिवसातच त्यांनी माऊडाॕक,कोहिमा इत्यादी ठाणी जिंकून ही सेना इंफाळपर्यंत पोहोचली,परंतु तिला इंफाळ माञ जिंकता आल नाही.याच सुमारास महायुद्धाचे पारडे फीरले.जर्मनी,जपान यांची निरनिराळ्या आघाड्यांवर पिछेहाट होऊ लागली.त्याबरोबर आझाद हिंद सेनेलाही माघार घ्यावी लागली.आणि याच काळात सुभाषचंद्र बोस एका विमानाने टोकियोला जात असताना विमान अपघात त्यांचा १८- आॕगस्ट-१९४५रोजी नेताजींचा दुदैवी अंत झाला. त्यांचे देशप्रेम,त्याग,ध्येयनिष्ठा,धडाडी यांच्यातून असंख्य भारतीयांची मने राष्ट्रभक्तीने पेटून उठली.आणि आपला देश स्वतंत्र झाला.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रमाण



लेखक – शंकर नामदेव गच्‍चे  नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here