नदीकाठ ओरबाडला तस्करांनी… यातना भोगतायत शेतकरी

0
9



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात नदीपात्र तसेच लगतच्या जमिनीतून वाळूंचे यापूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे.काही अधिकारी,कर्मचारीच वाळू तस्करी करत असल्याने सगळ्यांनी मिळून नद्या,ओडे ओरबडू अशी काहीशी परिस्थिती जत तालुक्यात सुरू आहे.अगदी जेसीबी, पोकलॅन फिरवून वाळू उपसा केला. आता नदीकाठ ढासळत असल्याने नदीकाठावर पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी यातना भोगताना दिसत आहेत.








जत तालुक्यातील बोर,कोरडा या प्रमुख नद्या तसेच त्यांचे उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहेत. पूर्वी वाळू लिलाव होत होते; मात्र आता हरित लवादाच्या निर्बंधामुळे वाळू लिलाव थांबलेले आहेत. यापूर्वी नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन होत असे. वाळू काढणारे यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडून घेत. आता याचा दुष्परिणाम जागोजागी पाहायला मिळतो. ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदलले आहे. पुराचे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसून शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे.




नदीपात्रात मोठी डबकी निर्माण झाल्याने स्थानिक जनतेलादेखील धोका निर्माण झाला आहे. नद्या ओलांडून शेतकरी आपल्या शेतामध्ये कामाला जात होते, मात्र आता नदीमध्ये मोठाले डबरे पडल्याने धोका वाढला आहे. नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.







नद्यांमधून तसेच पात्रालगतच्या जमिनींचे याआधीच मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले आहे. नद्यांमधील जीव साखळी विस्कळीत झालेली आहे. ही जीव साखळी परस्पर पूरक काम करत असते. बेकायदा उत्खनन थांबले नाही, तर पर्यावरणाचे नुकसान कधीही भरुन येणार नाही.एखादी स्थानिक प्रजाती संपली, तर पुन्हा निर्माण होत नाही.










वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी क्रश सॅन्डचा वापर केला जातो. भविष्यात वाळू ही इतिहासजमा होईल. क्रश सॅन्डच्या माध्यमातून अगदी उत्तम बांधकाम केले जाऊ शकते. क्रश सॅन्ड आणि सिमेंटचा योग्य वापर केला, तर बांधकाम मजबूत होते हे नागरिकांना समजावून सांगण्याची गरज आहे.तरच वाळू तस्करी थांबली जाईल,अन्यथा कोणतेही अधिकारी येदेत तालुक्यात यंत्रणाच इतकी बरबटली आहे की त्या अधिकाऱ्यांला यात सामावून घेतील अन्यथा बदनाम करून बदली करण्यासाठी भाग पाडतील. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here