जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील गिरगाव येथे एका 24 वर्षीय युवकाने आपल्या आई-वडिलांकडे नवीन मोबाइल घेण्याची मागणी केली. मात्र पालकांनी आर्थिक अडचणीमुळे मोबाइल घेऊन दिला नाही,म्हणून नाराज झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.शंकर निंगाप्पा मांग(वय 24)असे मयत युवकांचे नाव आहे.गुरूवारी सकाळी ही घटना घडली.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,
जत तालुक्यातील गिरगाव येथील शंकरने बारावीचे शिक्षण पुर्ण केले आहे.आता तो वडीलाला शेती कामात मदत करत होता.वडील निंगाप्पा मलाप्पा मांग शेतीबरोबर गावात कोतवाल म्हणूनही काम करतात.गेल्या काही दिवसापासून शंकर यांने आपल्याला नवीन मोबाइलची आवश्यकता असल्याने त्याने पालकांकडे मोबाईलची मागणी केली होती.सध्या पैसे नाहीत.थोडे दिवस थांब, पैसे जमा करतो,नंतर मोबाईल घेऊन देता,असे वडिलांनी त्याला सांगितले होते.सर्व जण घराबाहेर गेले असताना नाराज झालेल्या शंकरने आज गुरूवार सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती उमदी पोलिसांना कळवल्यानंतर सा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. सांयकाळी उशिराने पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.