जत,प्रतिनिधी : शुक्रवार सकाळपासून ढगाळ वातावरण झाल्याने जतसह सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार हबकले आहेत. धुरकट आणि अधून मधून पावसाचे बारिक थेंब येवू लागले. आकाश झाकाळून गेले. याचा सर्वाधिक फटका फळेे परिपक्व होत आलेल्या द्राक्षबागांना बसत आहे.दावण्या,
बुरी रोगाला पोषक वातावरण झाल्याने
बागायतदारांना औषधाच्या अतिरिक्त फवारण्या कराव्या लागत आहेत.
जत आणि परिसरात एक लाख एकराहून अधिक क्षेत्रावर द्राक्षबागा विस्तारल्या आहेत.जवळजवळ सर्वच बागांमध्ये यंदा द्राक्षांचा बहर उत्तम आहे.
शुक्रवारपासून निर्माण झालेल्या वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. अशा वातावरणाची पूर्वकल्पना असल्याने बागायतदार सतर्क असला तरी पाऊस कसा आणि किती होणार आहे, याची शाश्वती नसल्याने चिंता वाढली आहे.दावण्या,भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल अशी शक्यता आहे. अशावेळी बागेवर कोणत्या औषधांची फवारणी करावी, कशाप्रकारे बागेची काळजी घ्यावी, याबाबत बागायतदार जागरुक आहेत. परंतु पावसाचा जोर वाढला तर द्राक्षमणी फुटून मोठे नुकसान होण्याची भीती आहे.