शिराळा : सध्या दिवाळीची धामधूम असली तरी शहरी भागात खरेदी करणारांची गर्दी दिसत आहे.ग्रामीण भाग मात्र ओस पडलेली दिसत आहेत.खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील दिवाळी ही दिवाळखोरीत निघाली असल्याचे चित्र कुठेतरी दिसत आहे.संपूर्ण बाजारपेठा खाली खाली दिसत असल्याने. अनेक व्यापाऱ्यांनी जेमतेमच आपल्या दुकानात माल भरला आहे. बाजारपेठेत गिऱ्हाईक नसल्याने त्यांचाही धंदा आतभट्यात आला आहे.ग्रामीण भागात दिवाळीची खरेदी धीमी गतीने असली तरी शहरे मात्र गजबजलेली आहेत.त्याचबरोबर या वर्षीची दिवाळी काहींच्या घरी फूलुन आहे तर काहींच्या घरी मलीन आहे.
शेतकऱ्याचा गेल्या वर्षी महापुराने, यावर्षी कोरोनाने जीव घेतला. त्यातून कुठेतरी पीक चांगले आले होते त्यात पावसाने सगळं काही बुडवलं. सरकारची मदत अजून कागदावरच आहे. आणि जरी ती खात्यात आली तरी ती तुटपुंजी असणार आहे. गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा अजून शेतकऱ्याच्या माथी तसाच आहे. ज्यांना पगार मिळतो, ज्यांचा धंदा चालतो त्यांना दिवाळी चांगली जाणार हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे ज्यांना घराबाहेर पडता आलं नाही, कोणता धंदाच करता आला नाही, आणि निसर्गाने सर्व हिरावून घेतलं त्यांची कसली आली दिवाळी.
त्यामुळे शहरी भाग हा आनंदाने दिवाळी करत असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दिवाळी मात्र याहीवर्षी होईल की नाही शंका वाटते.नेहमीप्रमाणे दिवाळीचा उत्साह फार कमी दिसत आहे. प्रत्येक वर्षी आनंदाने साजरी होणारी दिवाळी या वर्षी तितक्याच आनंदाने साजरी होईल असं चित्र बाजारपेठेत फिरल्यावर मात्र दिसत नाही. प्रत्येक वर्षी पाहुण्यांच्या कडे, लेकीबाळीकडे दिवाळी घेऊन जाणारा शेतकरी यावर्षी मात्र गप्प घरात बसला आहे. शेतात भाजीपाला राहिला नाही, कि पिक राहिलं नाही.अनेक दूध संस्थांनी यावर्षी बोनस दिला परंतु आधीची उधारी त्या बोनस मधून कापून घेतल्याने शेतकऱ्याच्या हातात मात्र भोपळाच आला. अशा अवस्थेतच ग्रामीण भागातील शेतकरी दिवाळी करणार तरी कशी, आणि कर्ज काढून केलेली दिवाळी गोड लागणार तरी कशी.