जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा एकदा गांज्याची तस्करी अधोरेखित झाली आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसात तीन ठिकाणी पोलीसांनी कारवाई करत सुमारे 69 लाखाचा गांज्या जप्त केला आहे.
तालुक्यातील पोलीसांनी महसूल विभागाच्या मदतीने गांज्या तस्करांचा बिमोड करत,गांजा शेतीचे तालुक्यातून समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
गेल्या काही दिवसात तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, जत व उमदी पोलिसांनी उमराणी,जालीहाळ बुद्रूक व सिंदूर येथे कारवाई करत 69 लाखाचा ओला गांजा जप्त केला आहे.जत तालुका हा कर्नाटक राज्याच्या सिमावर्ती भागातील तालुका असल्याने या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावलेले आहेत.
सांगलीचे नूतन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीसप्रमुख दिक्षीत गेडाम यांनी अवैध व्यवसाय तसेच विनापरवाना खासगी सावकारी मोडीत काढण्याचा विडा उचलला असून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याकडील अधिकारी यांना अवैध व्यवसाय व खासगी सावकारांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्त आदेश दिल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कारवाई करत आहेत.मात्र अशा कारावायात सातत्य राखणे गरजेचे आहे.
तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये ऊस,हळद,मका,डाळींब,केळी आदी पिकांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणात लागण केली जात आहे.असे असले तरी पोलीस केवळ खबरेमार्फत माहीती मिळाली म्हणून कारवाई करण्याऐवजी स्थानिक तलाठी,पोलीस पाटील यांच्या माध्यमातून पथके तयार करून गांज्या शेतीचा शोध घेऊन गांजा शेतीचे समूळ उच्चाटन करावे.









