महाप्रलयंकारी पर्जन्यवृष्टी ने शेतकऱ्यांचे दिवाळे काढून त्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. होत्याचे नव्हते एका तासात झाले. आर्थिक अडचणीचा सामना करणारा पोशिंदा हवाल- दिवाल झाला.अनेक आशा – अपेक्षांची पूर्तता होण्याच्या मार्गावर असताना पालथ्या घागरीवर पाणी फेरले गेले. निसर्गाच्या चक्रात कचकटून सापडणारा ,नेहमीच संकटाशी सामना करणारा शेतकरी खरोखर बेचेन ,व्याकुळ, हतबलता सहन करताना दिसतो. मनगटाच्या जोरावर घामाच्या धारांनी सर्वस्व पणास लावून मशागत करणारा.आलेल्या पिकावर उसनवारी करून दिमाखाने सावरण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यावर तरंगताना दिसले. शेतकर्यांच्या वाट्याला नेहमीच येतो संकटाचा पाढा. शेतकऱ्यांच्या स्वप्नांची निसर्गाने राखरांगोळी केली. काय पहावे स्वप्न शेतकऱ्यांनी? कोणाचा आधार घ्यावा? झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळेल? दीडदमडीच्या अनुदानावर सावकार बी-बियाणे रोजंदारी यांची गणिते कशी मांडणार? त्यांच्या आशेचा किरण कुठे दिसणार? अशा अनेक प्रश्नांची खैरात निसर्गाने शेतकऱ्यांच्या कपाळी मारली आहे. मानव निर्मित आणि निसर्गनिर्मित समस्यांनी शेतकऱ्यांना ग्रासलेले आहे. सोयाबीनचे स्वप्न रंगवलेला शेतकरी डोळ्यातील अश्रूंनी ओलाचिंब झाला. त्याच्या सांत्व नास जाऊन त्याच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखे होणार नाही का? बळीराजाच्या डोळ्यातील दोन अश्रू कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांवरील रोगराई वादळाच्या समस्या या त्यांच्या जीवनातील समस्या बनलेल्या आहेत. या समस्येने तो आपले आत्मभान विसरला आहे. शासनाने बळीराजाच्या गंभीर समस्येची दखल घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याची अत्यंत गरज आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. अस्मानी संकट दूर करून त्यांना दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा मनोमन मोठा दिलासा देणे काळाची गरज आहे. त्यांच्या दुःखाच्या बांधाना वाट मोकळी करून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांच्या अंधारमय जीवनात दिवाळीचा सुखकारक प्रकाश निर्माण करणे आवश्यक आहे.
कांबळे चंद्रकांत उमरगा
7038269331