सांगली : कोविड आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना पुन्हा काही वेगवेगळे त्रास होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना तपासणे व आवश्यक औषधोपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे पोस्ट कोविड ट्रिटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोविड मधून बरे झाल्यानंतर काही त्रास उदभवणाऱ्या रूग्णांना सेंटर अतिशय महत्वाचे ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
सांगली जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णाचा आलेख आता दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. मात्र, कोरोनाचे संकट आजही कायम आहे. मार्चपासून आज अखेर जवळपास 40 हजार जण कोरोना बाधित झाले. त्यापैकी 34 हजार जण कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांमध्ये इतर आजार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या वतीने पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.







