मुलांच्या शाळेला सुट्टी म्हणजे जशी मुलांना मामाच्या गावाला जाण्याची ओढ, तशीच बाईलाही ओढ लागते ती माहेरच्या वाटेची. यंदाची उन्हाळी सुट्टी हि कोरोना मुळे ताळेबंद झालेली होती म्हणूनच खूप इच्छा दाटून येऊनही माहेरी जात आले नाही याची खंत होतीच मनात. अशा वेळी महिलांनी फोन,व्हिडिओ कॉल यावर समाधान मानले. कारण या काळात भेटण्याच्या ओढीपेक्षा आपले आणि माहेरच्या माणसांचे आरोग्य जास्त महत्वाचे आहे हे जाणले होते.
एरव्ही मात्र लेक माहेरी आल्यानंतर नातवंडांच्या किलबिलाटाने भरून गेलेल्या घरात आनंद ओसंडून वाहतो. रोजच्या जवाबदारीतून मुक्त होऊन थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळणारे हक्काचे ठिकाण म्हणजे माहेर. या माहेरच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या अनेक संख्यांचे सुंदर काव्य, माहेरच्या विरहाची सल शब्दबद्ध करणाऱ्या अनेक कथा कहाण्या प्रसार माध्यमातून नजरेखाली आल्या. टाळेबंदी शिथिल झाल्याबरोबर ज्यांना शक्य होते त्या आपल्या सोयीने पाखरांच्या गतीने माहेरी उडाल्या. तर ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी कल्पनेच्या सागरातील माहेरपणात मनसोक्त डुबक्या मारल्या.
पूर्वी जेंव्हा बाईला स्वतःला निर्णय घेण्याचा तितकासा अधिकार घरात नसायचा तेव्हा श्रावणात येणारे सणवार व्रत वैकल्य या निमित्ताने हमखास काही काळ माहेरी जायला मिळायचे. आणि थोडं निवांतपणंही मिळायचे. श्रावण म्हटलं म्हणजे केवळ पाऊस, हिरवळ, मनाची हुरहूर,कविकल्पनांचा महापूर नसून, अनेक सणांचा सोबतीहि आहे.नागपंचमी, नारळीपौर्णिमा,मंगळागौर, गौरी गणपती अशा अनेक सणांचे निमित्त करून माहेरी घेऊन जाणारा हा श्रावण प्रत्येक सासुरवाशिणीच्या जिव्हाळ्याचा होता.
“बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला,” म्हणत आपल्या भावाची, वडिलांची चातकासारखी वाट बघणारी ती, न्यायला आलेल्या भावाला बघून आपसूक डोळ्यात टचकन पाणी यायचं तिच्या. माहेर गरीब असो व श्रीमंत ओढ हि सारखीच. सणवार हे फक्त निमित्त होते. आपल्या लेकीचा हालहवाल जाणून घेण्यासाठी , तिचे सुख डोळे भरून पाहण्यासाठी आई वडील आतुर झालेले असायचे. समाज माध्यमांचा तितकासा उहापोह झालेला नसल्याने त्या माहेरपणात, त्या भेटण्यात एक अनामिक ओढ असायची. अनेक आनंदि दुःखी क्षण, लहान सहान प्रसंग सगळं निवांत आईजवळ बसून तिला सांगायचे असत. तिचा हालहवाल जाणून घ्यायचा असे. माहेरी आलेल्या मैत्रिणीसोबत पुन्हा काही काळ हितगुज करायचे असे, त्यामुळे माहेरी जाण्यासारखी आनंदाची पर्वणी बाईला दुसरी नसायची. म्हणूनच आईच्या हाताची चव पुन्हा एकदा चाखून,ताजे तवाने होण्याचे ते दिवस असत. माहेरी आलेल्या लेकीला कुठे ठेऊ नि कुठे नको असे आईला होई. कितीही बहिणी असो, एक दिवसाची का असेना हक्काची माहेरची ओढ सर्वांनाच हवीशी वाटणारी असते.
नवपरिणिताला माहेरची ओढ जरा जास्त असणे हे स्वाभाविक आहे. जेथे वीस बावीस वर्ष ती हक्कने वावरली, तेथून एकदम नव्या वातावरणात रुळताना जुन्याची ओढ हि वाटणारच. अशावेळी श्रावण तिला नक्कीच जवळचा सखा वाटत असणार.सणाचा राजा असलेला हा श्रावण तिला हमखास माहेरी घेऊन जाई. एकदा का मुलगी माहेरी आली कि गोडधोड पदार्थांची आरास, मैत्रिणींचा घोळका, गाणी ,झुल्यावर झुलणे,अंगणातील गप्पा, या सगळ्या आठवणीत तीच मन रुंजी घालत असे, माहेरी जाण्यासाठी आसुसलेले तिचे डोळे न्यायला आलेल्या भावाला, वडिलांना बघून आपोआप पाण्याने भरून वहात पण तेही आनंदाने.
काळ बदलला तसे स्त्री स्वावलंबी झाली.पुढे ती स्वतः पतिदेवांसह माहेरी जाऊन येऊ लागली. मुलांच्या शाळा, क्लास, स्वतःची नोकरी, घरच्या सगळ्या जवाबदार्यातून वेळ काढत ती माहेरपण जपू लागली. नोकरी, व्यवसाय सांभाळत संसारात रमलेली ती माहेर जवळ असो वा दूर पण मोहरी जाण्याचे प्रसंग हळूहळू कमी होत गेले. पण ओढ मात्र कमी झाली नाही. संपर्क माध्यमांमुळे सगळ्या गोष्टी लगेचच शेअर करता येऊ लागल्या मुळे मग माहेरी अगदी रोजच किंवा हरघडी बोलणं शक्य झाले. मन लागेचच मोकळे करता येऊ लागले. त्यामुळे अनेकदा पुरेसा विचार न करता चटकन निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची सवय वाढत गेली. आणि मग त्याचे दुष्परिणाम हळूहळू समोर येऊ लागले.
नव्याने लग्न झालेली,स्वर्ग सुखात लोळणारी अनघा दुपारच्या मोठ्या निवांत वेळी आई आणि बहिणीसोबत तासंतास फोनवर बोलत असे. घरातील सर्व घडलेल्या बारीक सारीक घटनांचा जणू आढावा तिचे माहेर घेतेय कि काय असे वाटावे.नवपरिणितेला माहेरची ओढ असणे हे समजू शकतो. परंतु नवेपण सरल्यावरही हातातील फोन या माध्यमाचा उपयोग करून बारीकसारीक गोष्टी आई वडिलांना सांगणे. त्यावर कसलाही विचार न करता सतत इतरांचे सल्ले ऐकणे या सवयीमुळे अनघा त्यात गुरफटत गेली. इतकी कि तिला तिच्याच घरातील माणसांची, तिच्या जोडीदाराची हरएक गोष्ट चुकीची वाटू लागली. बरं आई वडिलांनी थोडे सबुरीने घेऊन तिला आत्मनिर्भर बनवावे, तर तेही लहान सहान गोष्टीवरून राईचा पर्वत बनवू लागले. सासर माहेरच्या हिंदोळ्यावर दोन बाजूला दोन पाय ठेऊन उभी असलेली अनघा अगदी तोल जाऊन पडायची वेळ आली. सगळ्या नात्यात कटुता भरून गेली. अनघा बाळंतपणाला माहेरी गेली. लहान सहन गोष्टींनी सुरु झालेल्या वादांनी रौद्र रूप धारण केले होतेच. सासर माहेर तर बाजूलाच राहिले, पण तीचा जोडीदार आणि तिच्यात एवढे बेबनाव आणि कटुता वाढली कि तिच्या संसाराची वाट लागण्याची वेळ आली. शब्दाने शब्द वाढत गेले. अगदी कुटुंब न्यायालयात केस उभी राहिली. नुकताच जन्म घेतलेल्या बाळाचाही कुणी विचार करेनासे झाले. जो तो आपला इगो कुरवाळू लागला. पुढे दोघे एक झाले पण तिला माहेर दुरावले. काळ हा सर्वांवरील उपाय असतोच. परंतु चांगुलपणाला गालबोट लागले ते कायमचेच. चूक कुणाची होती हे तितकेसे महत्वाचे नाही. पण झालेले नुकसान हे कधीही भरून न निघणारे असते. असे अनेक प्रसंग सर्रास बघायला मिळतात. नात्यांमध्ये पडणाऱ्या भेगा या अनेकदा न भरणाऱ्या ठरतात.
जशी आपल्याला माहेरची ओढ वाटते तशी ती घरातील सून किंवा भावजयीला हि वाटणारच याची जाणीव प्रत्येक स्त्रीने ठेवली तरीही नात्यातील ओल टिकून राहील. आज भाऊ भावजय सोबत संबंध बिघडलेल्या असंख्य जणी असतीन ज्यांना माहेर असून माहेरपणाला मुकलेल्या आहेत. धावपळीच्या या युगात पुन्हा ते माहेरपणाचे निवांत क्षण अनुभवणे दुरापास्त झालेले असले तरीही नात्यातील ओल टिकून ठेवण्यासाठी समजदारीचे खत हे घालावेच लागेल. आज जग जवळ आलेले असले तरी मने दुरावण्यास मात्र साधेही कारण पुरेसे ठरताना दिसतेय. आज अनेक सख्या सासर माहेर दोन्ही ठिकाणे सामंजस्याने टिकवून आहेत. दोन्ही कडील जवाबदाऱ्या अगदी धीराने पेलताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काहींचे दोन्ही कडेही पटेनासे झालेले आहे. कामाच्या धबडग्यात पुरेसा वेळ देणेही काहींना जमत नाहीये.
असे असले तरीही श्रावणातील ऊन सावल्यांचा लपंडावाचे पडसाद मनातील भावनांवर उमटल्याशिवाय रहात नाहीच. आणि आपसूकच बहिणाबाईंच्या ओवी गुणगुणत मन माहेराच्या आठवणीत चिंब भिजून जाते.
लागे पायाला चटके रास्ता तापीसन लाल;
माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल.
माहेरून ये निरोप सांगे कानामंधी वारा
माझ्या माहेराच्या खेपा ‘लौकी ‘ नदीले विचारा .
मनीषा चौधरी, नाशिक
9359960429