अवैध दारू साठा जप्त, लाखो रुपयांचा गुटखा जप्त, शेतामध्ये गांजा पिकवणारा गजाआड अशा बातम्या आपण नेहमीच वर्तमानपत्रात वाचत असतो. विशेष म्हणजे देशभरात लॉक डाऊन असतानाही वर्तमानपत्रात या बातम्या येतच होत्या. लॉक डाऊनमध्ये दारू विक्रेत्यांनी दारू ब्लॅक ने विकली. गुटखा, गांजा यासारख्या अमली पदार्थावर राज्यात बंदी असताना काही महाभाग या बंदीची संधी साधून गुटखा उत्पादन करून तो बाजारात विकायला आणतात. काही ठिकाणी तर पोलीस व प्रशासनाचे हात ओले करुन बेधडक या मालाची विक्री केली जाते. वरिष्ठांकडून दबाव आल्यास कारवाईचा दिखावा केला जातो, काही दिवसांनी या अवैध व्यवसायांचा पुनःश्च हरिओम होतो. कारण संबंधितांनी सोडलेली लाज. केवळ पैसे कमवणे या एकाच उद्देशाने हे महाभाग समाजाचे आरोग्य धोक्यात घालतात. गुटखा खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोक कर्करोगासारख्या असाध्य रोगाला बळी पडतात. गुटखा खाल्ल्यानंतर कर्करोग होतो हे माहीत असूनही गुटखा बनवणारे बनवतात, विकणारे विकतात आणि खाणारे खातात. दारुबंदीचा फक्त फार्स केला जातो. ज्या भागात दारुबंदी आहे त्याभागात तर जास्त दराने दारू विकली जाते. दारूमुळे हजारो कुटुंब उध्वस्त झाली आहेत. दारूमुळे कुटुंबाची राखरांगोळी होते, दारू पिणाऱ्याला देखील यकृताचा आजार होतो. तरीही लोक दारू पितात कारण त्यांना ती सहज उपलब्ध होते. हजारो संसार उध्वस्त करणारे, समाजातील आरोग्याची नासाडी करणारे, कॅन्सर सारख्या रोगांचा विळखा घालून मृत्यूसमीप नेणारे उद्योग कोणी करू नये अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असली तरीही सारे काही पैशासाठी! या उक्तीप्रमाणे हे लोक काम करतात. यांना कोणाच्या संसाराचे देणेघेणे नाही की कोणाच्या आरोग्याचे. यांचा उद्देश केवळ आणि केवळ पैसे कमवणे हाच आहे. आपला पैसा कमावण्याचा व्यवसाय हा कोणाचा तरी संसार उध्वस्त करणारा असेल तर त्या पैशांतून आपल्याला समाधान मिळेल का याचा विचार संबंधितांनी करावा. ज्यांचा संसार उध्वस्त झालाय, व्यसनांमुळे ज्या घरातील कर्ता पुरुष देवाघरी गेलाय त्या घरातील लोक या लोकांना शिव्या शाप देतच असतील तेंव्हा असे शिव्या शाप मिळणारा व्यवसाय करण्याऐवजी लोकांचे आशीर्वाद मिळतील असा व्यवसाय संबंधितांनी करावा.
श्यामब ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे, ९९२२५४६२९५