जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील हळ्ळी ते उटगी दरम्यान वन विभागाच्या हद्दीत सशाची शिकार करून, त्याला पिशवीत बांधून घेऊन जात असताना विनोबा बाबू चौगुले (वय 42) व महादेव लखान्ना कोळी (60, रा. दोघे रा. उटगी, ता. जत) यांना रंगेहात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.त्यांना जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. पाटील यांच्यासमोर उभे केले असता, दोन दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
जत तालुका वन अधिकारी एम,एच. मोहिते व परिमंडल वन अधिकारी शंकर गुगवाड हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यां समवेत खलाटी येथे मोराची शिकार केलेल्या प्रकरणातील
संशयित आरोपी जयवंत दिलीप काळे (28 रा. सोनी, ता. मिरज), लक्ष्मण पाखण्या पवार (70, रा. आरग, ता.
मिरज), शशिकांत प्रभू पवार (22, रा. हळ्ळी, ता. जत) या तिघांना तपासासाठी हळ्ळी येथे घेऊन जात असताना, विनोबा चौगुले व महादेव कोळी हे दोघे वन विभागाच्या हद्दीत संशयितरित्या फिरताना त्यांना दिसून आले. त्यानंतर मोहिते व गुगवाड यांनी गाडी थांबवून या दोघांना संशयावरून बोलावून चौकशी केली असता, त्यांच्याकडील पिशवीत सशाचे मांस सापडले.या दोघांनाही त्यांच्या घरी
नेऊन व ज्याठिकाणी ससा मारुन त्याचे चमडे काढले आहे, त्या ठिकाणी नेऊन चौकशी केली असता, त्यांनी ससा मारल्याची कबुली दिली. एका मारलेल्या सशासह त्यांना ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान, सोमवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
उटगी येथील वनविभागाच्या हद्दीत शिकार केलेल्या संशयितासह वनविभागाचे पथक