संपूर्ण जगातीला जास्तीत जास्त समाजातीला लोकांना लागलेले व्यसन म्हणजे तंबाखूचे होय. हे वाढते व्यसनाचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने नो टोबॅको डे ची निर्मिती केली तेव्हापासून दरवर्षी 31 मे हा दिवस तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
तंबाखूच्या व्यवसायात लाखो शेतकरी गुंतले असून भारतात पिकणाऱ्या तंबाखू पैकी 80 टक्के देशातच खपते. यांचे दुष्परिणाम भयावह आहेत हे माहित असतानाही देशात तंबाखू घेण्याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे.
तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या सानिध्यात आलेल्या बऱ्याच लोकांनाही यांचे परिणाम भोगावे लागतं आहेत. शालेय मुलांच्या पासून वृद्धापर्यंत हे व्यसन तीव्र स्वरूपाचे झाले आहे. तंबाखू सेवनाने कॅन्सर, हृदयविकार, मेंदूविकार, मेंदूचा झटका, रक्तवाहिन्यांत गुठळी होणे, पायाला गँगरीन होणे, दात पडणे, हिरड्यांचे विकार, तोंडाला दुर्गंधी येणे, ओठ, घसा, गाल, यकृत, स्वरयंत्र, अन्ननलिका, फुफुस, प्रजनन क्षमता, यावर मोठा परिणाम होत असतो. शिवाय पैश्याची मोठी हानी होते. याची कल्पना असतानाही तरुणाई मात्र नशेच्या विळख्यात आडकताना दिसत आहे.जागतिक आरोग्य संस्थेनुसार जर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले तर 2030 पर्यंत दरवर्षी तंबाखूमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या 8 दशलक्षपर्यंत जाईल.धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये 22 पटीने कर्क रोग होण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक सहाव्या सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. भारतात दरवर्षी सहा लाख पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तंबाखूसेवांनामुळे होतो. डॉ. सतीश राव (एशियन इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजी, मुंबई ) यांच्या मते तंबाखूमध्ये सुमारे 4 हजार प्रकारची केमिकल्स असतात. यापैकी 60 केमिकल्स मुळे कर्क रोग होऊ शकतो. त्या पैकी कार्बन मोनाआक्सइड, नायट्रोजन आकसाइड, अमोनिया आणि हायड्रोजन सायनाइड ही अतिशय घातक केमिकल्स असतात. तर डॉ. पंकज चतुर्वेदी (हेड अँड नेक सर्जन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल) यांच्या मते तांबाखूमधील निकोटीन या द्रव्यामुळे तंबाखू सेवन करणाऱ्याला पुन्हा पुन्हा तंबाखू सेवन करण्याची इच्छा होते. भारतात तर खेड्यापाड्यात तंबाखूची मिश्री मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यामुळे दातात मिसरीचे बारीक कण अडकून बसतात त्यामुळे दाताचे आजार निर्माण होतात.
एकदा तंबाखूची चटक लागली की सुटत नाही. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण अधिक उद्भवते. पूर्वी 60 वर्षाचा आसपास कॅन्सर सारखे आजार होण्याचा धोका होता पण अलीकडे 40 वर्षाच्या आतील अनेकांना कॅन्सर आजार जडत आहेत.2012 मध्ये झालेल्या एका अभ्यासात पुरुषांमध्ये 42 टक्के आणि स्त्रियांमध्ये 18.3 टक्के कर्करोगाचे कारण हे तंबाखू सेवनाशी निगडित आहे.आपण शिक्षण घेतले, अनेक बाबींचा अभ्यास केला.इतिहास अभ्यासाला पण वर्तनात, राहणीमानात, जीवनशैलीत अनेकांनी बदल केला नाही. बऱ्याच सुधारकांनीही व्यसनाला विरोध केला. आश्या महापुरुषांना बरेच जण प्रमाण मानून दिवसाची सुरवात करतात पण प्रत्येक्षात वावरताना सर्व विसरून चुकीच्या पद्धती अवलंबतात. छ. शिवाजी महाराजांनी व्यसनाच्या बाबतीत स्वतःही आदर्श राहिले व सैन्यालाही आदर्श राहण्याचे आदेश दिले. संत तुकारामांनी व्यसनावर अनेक अभंग रचले. व तोंडात तंबाखूची नाळी धरणाऱ्या ढोंग्यांवर हल्ला केला. महात्मा जोतिबा फुले लहू वस्तादांच्या तालमीत जायचे व असा संदेश देत की इंग्रजी शिक्षण घेऊन सत्याची कास धारावी पण व्यसनाचा शंभर टक्के त्याग करावा.फुले शेतातून येत असताना काही इंग्रज सैनिक व्यसने करून धिंगाणा घालत होते तेव्हा त्यांना उसाने झोडपून काडले. स्वामी विवेकानंद यांनीही युवकांना व्यसनमुक्त राहण्याचे आव्हान केले.महामानव डॉ.आंबेडकरांना तर सुपारीच्या खंडाचे व्यसन नव्हते.ते परदेशात असतानाही व्यसनापासून दूर राहुन चरित्रसंपन्न जीवन जगले व कोणीही व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर व्यसनावर कीर्तन, प्रबोधन केले.आपणासही तंबाखूसह कोणतेही व्यसन नसेल तर पुढे करणार नाही आणि जडले असेल तर ते सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
त्यासाठी शाळेतून आलेल्या आपल्या मुलांच्या सोबत दिवसभरातील बाबीवर मुक्त सवांद साधावा. त्यांना अनेक इतिहासकालीन महामानवांची चरित्रे वाचनात आणून द्यावीत. व्यसन जडले असेल तर समुपदेशन करून घेणे, योगा करणे, सामाजिक आधार, योग्य आहार, जीवनशैलीतील बदल करून घेणे. राष्ट्रसेवेत वेळ खर्ची करणे, व्यायाम, चिंतन, मानन, लेखन, वृक्षरोपण या सारख्या गोष्टी केल्या तर बऱ्याच प्रमाणात व्यसनाला आळ घालू शकतो. सुदृढ़, निरोगी भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावू शकतो. आज 31 मे तंबाखू सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने सर्वांनी संकल्प करून सिद्धीस नेण्यास कटिबद्ध होऊ या.
संकलन :-
प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे
(राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र शासन)