जतच्या विस्तारित योजनेस केंद्रांच्या निधीसाठी पाठपुरावा करू
उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील दुष्काळ कायमचा हद्दपार करायचा असेल तर म्हैसाळ सिंचन योजना गावोगावी पोहचली पाहिजे. जत तालुक्यातील 65 गावात ही योजना पोहचलेली नाही. या योजनेचा प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.ही योजना मार्गी लावण्यात येईल.योजनेला प्रशासकीय मंजुरी तसेच केंद्राकडून 600 कोटींचा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री,रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.
ते उमदी ता.जत येथे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले असताना बोलत होते.यावेळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक घेत शेतकरी,जनतेशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.यावेळी आ. विलासराव जगताप, रिपाइंचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे,
उमदीच्या सरपंच वर्षा शिंदे,उपसरपंच रमेश हळके, निवृत्ती शिंदे, शिवानंद कुल्लोळी,
रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील,रिपाइंचे सांगली युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, रिपाइंचे जतचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय कांबळे, प्रशांत ऐदाळे, सुभाष कांबळे, बापू सोनवणे,बाबासाहेब कांबळे,श्रीकांत हुवाळे,नारायण कामत,
उपस्थित होते.आ.विलासराव जगताप यांनी म्हैसाळ विस्तार योजना मार्गी लावावी या मागणीचा धागा पकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले,जत तालुक्यातील दुष्काळ संपवायचा आहे.त्यामुळे कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था गरजेची आहे.जत तालुक्यातील सिंचनापासून वचिंत गावांना पाणी मिळवून देऊ.त्याशिवाय दुष्काळी मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही शेवटी ना.आठवले म्हणाले,
संजय कांबळे यांनी प्रास्ताविकेत जत तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती मांडली. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांच्या भावना त्यांनी व्यक्त करत दुष्काळग्रस्ताच्या मागण्या मान्य कराव्यात, केंद्र व राज्य सरकारने सहकार्य करावे असे आवाहन केले.
उमदी ता.जत येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दुष्काळी जनतेशी संवाद साधला,यावेळी आ.विलासराव जगताप,संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.