जत,प्रतिनिधी:जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शासन लोकांना पिण्याचे पाणीही देत नाही.दुष्काळी सवलती जनतेपर्यंत पोहोचल्याच नाहीत.यांची शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर तालुका बंद करू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी दिला.
जत तालुका राष्ट्रवादीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.तहसिलदार पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी सुरेशराव शिंदे, माजी उपसभापती शिवाजी शिंदे, रमेश पाटील,तालुकाध्यक्ष बसवराज धोडमनी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण,नगरसेवक स्वप्निल शिंदे,प्रवीण जाधव, सहकार सेलचे अध्यक्ष बाबूराव बागूल,युवती आघाडीच्या तालुकाध्यक्षा हेमलता निकम,भटक्या विमुक्त जाती आघाडीचे सचिन मदने,महेश निकम, राजू खाडे आदी उपस्थित होते.
सुरेश शिंदे म्हणाले, शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला, मात्र दुष्काळी सुविधा असणारे टँकर वेळेवर दिले जात नाही. शासनाने जाहीर केलेल्या फी माफीच्या सवलती विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत.चारा टंचाईमुळे पशुधन संकटात आले आहे.तरीही एकही छावणी तालुक्यात सुरू नाही. तालुक्यातील महामार्गांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.जनतेला धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.जतमधील सर्व शासकीय कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. सामान्य जनतेची लूट सुरू आहे.यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून सुधारणा करावी अन्यथा दुष्काळी जनतेच्या न्यायहक्कासाठी तालुक्यात बेमुदत बंद पुकारू असा इशारा शेवटी शिंदे यांनी दिला.यावेळी दिपमाला चिखली,हेमंत खाडे,अशोक कोळी, पवन कोळी,आनंद कांबळे आदी उपस्थित होते.
जत तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलनाचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.