टंचाईत हलगर्जीपणा करणाऱ्या पाणीपुरवठाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा,जत पंचायत समिती बैठकीत ठराव

0
6

 म्हैसाळ पाणी,पुर्व भागात गतीने दुष्काळ उपाययोजनाची मागणी

जत,(प्रतिनिधी): जत पंचायत समितीच्या गांर्भिर्य नसलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा बिडिओ अर्चना वाघमळे यांनी दिला.

जत पंचायत समितीची मासिक सभेत त्या बोलत होत्या.सभापती सुशिला तावशी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संपन्न झाली.पाणी पुरवठ्या बाबत पाणी पुरवठा विभागाची तक्रार सदस्यांनी मांडली.त्यावर वाघमळे बोलत होत्या.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे नियमित कर्मचारी कार्यरत असताना ते काम करत नाहीत.मानधनावर घेतलेले कर्मचारी काम चालविले जात आहे. नियमाप्रमाणे मानधनावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार प्रशासनाला काढता येत नाही. कामचुकार अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या सोयीसाठी मानधनावर कर्मचारी घेण्याची सक्ती करत आहेत.आपली जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू आहेत.असा आरोप सदस्यांनी सभागृहात केला.त्यावर गटविकास अधिकारी म्हणाल्या या कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना लेखी आदेश दिले आहेत. सध्यातरी सुरळीतपणे काम सुरू आहे.गोडावून मधील साहित्याची  संपूर्ण तपासणी झाल्यानंतर कामाची जबाबदारी निश्चित करणार आहोत.बोअर दुरुस्तीचे साहित्य नाही असे कारण पुढे करून पाणी असलेले बोअर दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे काही गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  पाणी पुरवठा विभागातील अधिकारी वर्गणीची सक्ती करत आहेत.त्यामुळे बोअर दुरुस्त होत नाहीत. यापुढे वर्गणीची सक्ती करू नये.नादुरुस्त बोअर तातडीने दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,अशा सक्त सुचना पाणीपुरवठा विभागाला बिडिओ वाघमळे यांनी दिल्या.याविभागाची तपासणी सुरू आहे.सदर तपासणीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करावी, असा ठराव बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.अंकलगी (ता.जत)साठवण तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही.सध्या या तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.पूर्व भागातील एकमेव पाणीपुरवठा केंद्र म्हणून त्याकडे बघितले जात आहे.तलावाखाली असलेल्या विहीरीतूून पाणी भरून घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.परंतु पाणीपुरवठा करण्यात येणारे गाव व तलाव यातील अंतर 34 ते 40 किलोमीटर इतके होत आहे.यामुळे वाहतूकीसाठी वेळ व पैसा याचा अपव्यय होत आहे.कर्नाटकातील घुटनाळ,जि.विजापूर येथील साठवण तलावातून टँकर भरण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अंतर कमी होणार आहे.त्यामुळे सीमा भागातील गावांना  तात्काळ पाणीपुरवठा करणे शक्य होणार होईल.प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी सदस्यांनी सभागृहात केली.विजापूर व सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित आहे,असे सांगण्यात आले.

     म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून जत तालुक्याला पहिल्या आवर्तनात कमी प्रमाणात पाणी आले आहे व जादा पैसे भरून घेण्यात आले आहेत.पैसे कमी भरूनही मिरज,कवठेमंकाळ,सांगोला व मंगळवेढा या तालुक्यात पाणी जादा सोडण्यात आले आहे. जत तालुक्याला प्रशासनाकडून सतत सापत्न वागणूक मिळत आहे.वरील तालुक्यातून पैसे किती भरून घेतले व पाणी किती सोडले यांची माहिती प्रशासनाने पुढील मासीक बैठकीत सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली.आरोग्य,प्राथमिक शिक्षण,अंगणवाडी दळणवळण,रस्ते,बांधकाम,घरकुल योजना, वीज वितरण कंपनी,एसटी बस वाहतूक,आदी विषयावर सभागृहात चर्चा झाली.या चर्चेत शिवाजी शिंदे,दिग्विजय चव्हाण,अप्पा मासाळ,रवींद्र सावंत,विष्णू चव्हाण,श्रीदेवी जावीर,मंगल जमदाडे,अश्विनी चव्हाण,अर्चना पाटील,मनोज जगताप,रामान्ना जीवन्नवार यांनी भाग घेतला.उपसभापती अँड. आडव्याप्पा घेरडे यांनी आभार मानले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here