जत,प्रतिनिधी : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला तुमची बबलेश्वर योजनेचे गाजर दाखवले जाते आहे.डफळे साखर कारखाना मुळात आमदार विलासराव जगताप यांनीच मोडीत काढला आहे.आमचे नेते जयंत पाटील यांच्यावर आरोप करून ते आपले कृत्य झाकत आहेत. काँग्रेस व भाजप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाच्यावतीने आयोजित पत्रकार बैठकीत करण्यात आला.बैठकीला राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,माजी सभापती मन्सूर खतीब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील,माजी जि.प.सदस्य चन्नाप्पा कोर्तीकर, रमेश पाटील, बसवरा दोंडमनी, जेके माळी, सिद्धू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. जत विधानसभा मतदारसंघात निष्क्रिय कामामुळे लोकप्रियता कमी झाल्यामुळे आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची गोपनीय भेट घेतली मात्र त्यांचा काहीही होकार मिळाला नाही,असा गौप्यस्फोटही या बैठकीत करण्यात आला.आमदार जगताप अध्यक्ष असताना चांगला कारखाना मोडीत काढला आहे.ऊस तोडणी वाहतूकदाराच्या नावे कर्ज उचलून घोटाळा केल्यामुळे कारखाना लिलावात काढावा लागला.राजारामबापू व्यवस्थापनाने नियमानुसार कारखाना विकत घेतला आहे. तालुक्यात दुष्काळ पडलेला असताना आमदार जगताप आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. कर्नाटकातून पाणी येणार आहे,असे गाजर दाखवणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे अशीही यावेळी मान्यवरांनी सूचना मांडली. पंचायत समितीच्या 53 कोटी रुपयांच्या मनरेगा घोटाळ्यामुळे संपूर्ण योजनेची वाट लागली आहे.घोटाळ्याने कामे थांबले आहेत.त्यामुळे त्याचा तालुक्याच्या विकासावर मोठा परिणाम झाला.अशा महत्वकांक्षी योजना आमदारांच्या बगल-बच्चामुळे बंद पडल्या आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.आमदार जगताप यांची माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कर्नाटकातील पाण्यापेक्षा यासाठी प्रस्तावित असलेली 75 गावची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी भाजपने आपली शक्ती खर्च केली असती,तर त्याचा पुर्व भागातील गावांना आधार झाला असता,मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.





