जत तालुका युवक कॉग्रेसचा निवेदनाद्वारे इशारा
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली असून शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर करून महिना उलटून गेला.तरीही सहा टँकर सोडून काहीही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना मरणयातना भोगायची वेळ आली आहे. प्यायला पाणी नाही,जनावरांना चारा नाही, अशा प्रचंड अडचणीत तालुक्यातील जनता आहे. शासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन मागेल त्या गावात पाण्याचे टँकर,चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा जत तालुका युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा काढू व आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की,जत तालुक्यात प्रचंड दुष्काळ आहे.पूर्व भागातील गावांची परिस्थिती भीषण आहे.दक्षिण उत्तर या भागातील गावे दुष्काळाच्या तोंडावर आहेत.त्यामुळे येथील जनता जगायची कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.पावसाअभावी रब्बी हंगाम वाया गेला आहे,त्यामुळे चारा,धान्याचा प्रश्न गंभीर आहे.गेल्या महिन्यात शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला खरा, मात्र कागदी उपाययोजना शिवाय प्रत्यक्षात जनतेला लाभ होतील असे काहीही सुरू केलेले नाही.सध्या येथील जनतेला आधार देणे गरजेचे असताना प्रशासन कोणत्याही उपायोजना करत नाही.त्यामुळेच जत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील जनतेला मागेल त्या गावात टॅंकर, चारा छावण्या व अन्य सुविधा तातडीने देण्यात याव्यात अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू,आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष विकास माने, उपाध्यक्ष गणी मुल्ला, कार्याध्यक्ष राहुल काळे, आकाश बनसोडे,अमर माने, योगेश बामणे,आदेश जाधव, दादा डिस्कळ,अनिल बेडगे, अनिल पाटील आदी कार्यक्रर्त्याच्या सह्या आहेत.
जत तालुक्यात तातडीने चारा छावण्या,टँकर सुरू करावेत या मागणीचे निवेदन देताना युवक कॉग्रेसचे कार्यकर्ते





