दुष्काळाने पुर्व भागाची दैना शासनच्या उपाययोजना सुरू होईनात,पाणी नाही,जनावरांना चारा नाही

0
29

संख,वार्ताहर : जत तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला असूनही उपाय योजना अभावी भीषण पाणी टंचाईचे दाहक चटके लोकांना बसू लागले आहेत. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत लोकप्रतिनिधींकडून टंचाई बेदखल केली जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.पावसाळ्यात पावसाने बगल दिली. यामुळे नोव्हेंबर पासूनच निम्यावर गावात तीव्र  टंचाई जाणवू लागली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यासंबंधी कोणत्याही उपाययोजना अद्यापर्यत सुरू केल्या नाहीत. तर तालुका प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.  तालुक्यात रब्बी हंगामातील 70 गावांची पीक आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.पिके न आल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पुर्व भागाती 70 वर गावात दुष्काळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.अनेक गावांत  पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही. रब्बी पूर्णपणे वाया गेलेला आहे. असे असतानासुद्धा दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून पुरेशी मदत होत नाही. यासाठी कोणी पाठपुरावा देखील करीत नाही.शासनाच्या कारभारामुळे दुष्काळी 70 गावांना मदतीपासून वंचित रहावे लागणार काय, असा सवाल केला जातो आहे.  

सद्यस्थितीत तालुक्याच्या पश्चिम भागात ‘म्हैसाळ’ चे पाणी आलेली गावे वगळल्यास अन्य गावांत सन 1972 पेक्षाही भीषण दुष्काळी स्थिती आहे. ही गावे दुष्काळाने होरपळून निघत आहेत. मात्र शासनदरबारी केवळ 30 टक्के भागातच दुष्काळी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे ‘म्हैसाळ’ चे पाणी आलेल्या गावांचाही यात समावेश आहे.

खरे तर खरीप व रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. पिण्याचे पाणी, चारा टंचाई गंभीर झाली आहे. रब्बी पिकांची तर पेरणीच झालेली नाही. काही भागात 30 टक्के जेमतेम पेरणी झाली होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने 15 दिवसातच कोवळी पिके करपून गेली.  

तालुक्यात खातेदारांच्या सातबारा  उतार्‍यावर दोन्ही हंगामातील पीकपाणी नोंद आहे.  तरी देखील  इंग्रजकालीन सन 1929 मधील नोंदीवर एकाच तालुक्याची खरीप व रब्बी हंगाम अशा दोन हंगामात विभागणी केली आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे. दुष्काळी परिस्थिती आहे त्या गावात पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. चारा टंचाई आहे. तरी देखील या रब्बी हंगामातील गावांत दुष्काळ जाहीर करायला दिरंगाई केली जात आहे.तालुक्यात दुष्काळ असला तरी राजकारणाचा सुकाळ आहे. गंभीर दुष्काळी स्थिती असून देखील याकडे लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी दुर्लक्ष करत आहेत. शासनाने दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्यावी. विनाविलंब चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here