कारवाईची मागणी
जत,प्रतिनिधी: जत बसस्थानातून जत ते वल्लभनगर या एसटी सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या लोकांची आर्थिक लूट सुरु आहे. हि लूट महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकींगच्या माध्यमातून होत आहे. याबाबतची लेखी तक्रार युवक नेते विक्रम ढोणे यांनी विभाग नियंत्रक सांगली यांच्याकडे दिली आहे. ढोणे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, वल्लभनगर(पुणे)-जत ही बस वल्लभनगर स्थानकावरून रात्री दहा वाजता निघते. या बसमधून जत तालुक्यातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आदि प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या बसची ऑनलाईन बुकींगची सुविधा असून बुकिंग करताना संगणकावर साधी बस दर्शविते.यावेळी तिकीट दर 435 रुपये दाखवून आरक्षण केले जाते.पण प्रत्यक्षात प्रवास करतेवेळी वाहकाकडून सदरची एसटी शिवशाही पद्धतीची असल्याचे सांगून तिकिटाचा फरक म्हणून पुन्हा 118 रूपये प्रवाशांकडून घेतले जाते. प्रवाशांनी फरक तिकीटाचे 118 रूपये नाही दिल्यास एसटीमधून उतरवले जाते.याबाबत प्रवास करणाऱ्या नागरिकात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तिकिटाचे ऑनलाईन बुकींग करतानाच पूर्ण रक्कम संगणकावर का दाखवली जात नाही. बुकींग करताना तिकीट साध्या बसचे अन् प्रवास करताना शिवशाहीच्या जबरदस्तीच्या बसचे ! अशी अजब शिक्षा जत तालुक्यातील प्रवाशांना बसत असून हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून चालू असल्याचे दिसून येत असून या प्रकारची गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी युवक नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.
जत आगाराकडून सुरू असलेली बस दरातील लुट थांबवावी या मागणीचे निवेदन देताना विक्रम ढोणे





