जत,प्रतिनिधी:गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डी.जे. लावून मोठा आवाज करण्यास सर्वोच्च न्यायालय, शासन यांच्यासह सामाजिक क्षेत्रातूनही विरोध केला जात आहे. डी.जे.चा मोठा आवाज ऐकल्यास हृदय रूग्णांवर मृत्यूदेखील ओढवू शकतो. याशिवाय संपूर्ण हयातभर राहणारा अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, छोटे बाळ आणि वृद्ध अशा सर्वांसाठी डी.जे. मिरवणूक जिवावर उठणारी आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी डी.जे.चा नाद टाळण्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांची ‘संकेत टाइम्स’ने चर्चा केली.
मानवी शरीर सहन करू शकते, एवढाच आवाज ऐकला पाहिजे. प्रत्यक्षात धार्मिक उत्सवामध्ये कर्णकर्कश आवाज असणार्या मिरणुकी काढण्यात येतात. त्यातून अनेक अपघात ओढवतात. डी.जे.च्या तालावर नाचत जाणार्या मिरवणुकीमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. अनेकांना आपले प्राण गमवावे लागते. हे लक्षात सर्वोच्च न्यायालयाने डी.जे. लावण्यावर प्रतिबंध घातला असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस व महसूल प्रशासनावर टाकली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेदेखील लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतील गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शासनाने यावर्षी गणेशोत्सवात स्पर्धा आयोजित करून हा सामाजिक उपक्रम लोकोपयोगी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच डी.जे.च्या तालावर नाचू नये, असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे. ध्वनी प्रदूषणाने अनावश्यक आवाज कानात गेला तर कानाचा पदडा फाटून मेंदूपर्यंत परिणाम होत असतो. हा आवाज कानात गेल्याने नाजूक आरोग्य पेशिका नष्ट होतात. त्या नष्ट झाल्या, तर आवाजाचे ध्वनी लहरी मेंदूपर्यंत पोहोचत नाही. त्यातून आयुष्यभराचा बहिरेपणा येतो. रहिवासी क्षेत्रात आवाजाच्या 55 डेसिबलपर्यंत संवाद साधू शकतो.65 डेसिबलपर्यंत व्यापारी क्षेत्रात आवाज सहन केला जाऊ शकतो. त्यापेक्षा अधिक आवाज हृदयाचे ठोके वाढवतो. रक्तदाब वाढतो. रुग्णांच्या रक्त वाहिन्या फुटू शकतात. मोठय़ा आवाजामुळे कानाचा पडदा हलतो. डी. जे.च्या आवाजाच्या ध्वनी लहरीमुळे 140 डेसिबलपर्यंत कंपन वाढतात. त्यातून मृत्यूही होऊ शकतो.जत गणपती विसर्जन मिरवणूक रस्त्यावर 15 वर हॉस्पिटल असून जिल्हा सामान्य रुग्णालयही आहे. डी.जे.च्या आवाजाचा रुग्णांच्या उपचारावरही परिणाम होतो. हे मानव निर्मित ध्वनी प्रदूषण टाळले जाऊ शकते. गणेश मंडळांनी त्याकरिता सहकार्य करावे.
डी.जे.चा आवाज मानवी कान आणि मेंदूला घातक आहेत. याशिवाय पशु, पक्षी हेदेखील मोठा आवाहज सहन करू शकत नाहीत. मोठय़ा आवाजामुळे वातावरणात ध्वनी प्रदूषण वाढते. पशू, पक्षी सायंकाळी आपल्या घरट्याकडे जात असतात. त्यांच्यापर्यंत डी.जे. सारख्या यंत्रांचा मोठा आवाज गेल्यास हे पक्षी झोपू शकत नाहीत. पक्षांच्या लहान पिलांवर मोठय़ा आवाजाचा वाईट परिणाम होईल. शहरात हॉस्पिटल, शाळा आदी शांतता क्षेत्रातून डी.जे. मिरवणूक फार त्रासदायक ठरत असते. कर्णकर्कश मोठय़ा आवाजामुळे काचा फुटतात. हृदयाची धडधड वाढते. छोट्या बाळावर मानसिक विपरित परिणाम होऊ शकतो.
डॉ.रविंद्र आरळी,वैद्यकीय व्यवसायिक
डी.जे.च्या मोठय़ा आवाजामुळे बेचैनी वाढून रक्तदाब वाढत असतो. त्यामुळे हृदय रुग्णांसाठी डी.जे. अत्यंत घातक आहे. मानसिक रुग्णांवरही मोठय़ा आवाजाचा विपरित परिणाम होतो. डी.जे.मुळे खुर्चीदेखील हलत असते. परीक्षा काळात मोठा आवाज कोणाच्याही कामाचा नाही. नवजात मुले, खुप आजारी रुग्ण डी. जे.चा आवाज सहन करू शकत नाही. लोकमान्य टिळकांनी लोकप्रबोधनाची भूमिका मांडली होती. ही भूमिका गणेशोत्सव मंडळांनी समजावून घेतली नाही. त्यांनी समाज प्रबोधन करावे. राज्य शासनाने प्रबोधन करायचे ठरविले आहे. हा सण आनंद व उत्साहाचा आहे. उत्सव साजरा करीत असताना डी.जे.मुळे निरूत्साह पसरविणे योग्य नाही. उत्सव त्रासदायक ठरत असेल तर हा असुरी आनंद टाळला पाहिजे.
– डॉ.शरद पवार,ह्रदयरोग तज्ञ जत
डी.जे.च्या मोठय़ा आवाजामुळे सर्वांच्याच आरोग्यवर परिणाम होतो. त्यातल्या त्यात लहान बालके सॉफ्ट टार्गेट असतात. बालकांची वाढ सुरू असताना त्यांनी आवश्यकतेपेक्षा अधिक मोठा आवाज ऐकला तर ते नेहमीसाठी बहिरे होऊ शकतात. मोठय़ा आवाज सुरू असताना संवाद बंद होतो. दुसर्याचे बोलणे ऐकू येत नाही. हृदयावर आघात होत असल्यासारखे वाटते. संवेदनशील व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू होतो. डोकेदुखी, मायग्रेनसारखे आजार वाढू शकतात. सोलापूर येथे डी.जे.च्या आवाजामुळे घराची भिंत पडली होती. त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याने सोलापूर, सांगली आदी जिल्ह्यांमधील गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तपणे डी.जे. लावणे बंद केले. कायद्याचे पालन झाले पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेला निर्बंध घालण्याची वेळ येण्यापूर्वीच गणेशोत्सव मंडळांनी स्वत: डी.जे. टाळावा.
-डॉ.विद्याधर पाटील, बालरोग तज्ञ





