संख,वार्ताहर: संख ता.जत येथील दोन महिन्यापुर्वीचे बलात्कार, खूनप्रकरण ताजे असतानाच पुन्हा एका 26 वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याचे पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती असल्याने खळबळ माजली आहे. याबाबत उमदी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, संख येथे पिडित मतिमंद मुलगी राहते. तिची आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मतिमंद मुलगी एकटीच घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यातून ती आता सात महिन्याची गर्भवती राहिली आहे. तिला त्रास होऊ लागल्याने पिडितीच्या आईने तिला दवाखान्यात दाखविले असता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
गावचे पोलिस पाटील,पिडित व तिच्या आईने उमदी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. दरम्यान दोन महिन्यापुर्वी एका महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा नविन प्रकार समोर आल्याने संखमध्ये खळबळ माजली आहे. तपास यंत्रणा चक्रावल्या आहेत. पिडित मुलगी मतिमंद असल्याने तिला व्यवस्थित बोलता किंवा सांगता येत नसल्याने तपास अधिकाऱ्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. पोलिसाकडून काही संशियतांकडे तपास सुरू आहे. याबाबतची फिर्याद पोलिंस पाटील सुरेश पाटील यांनी उमदी पोलिसात दिली आहे. अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे हे करत आहेत





