जत | दुतर्फा अतिक्रमणाने जत शहरातील रस्ते अरूंद,मंगळवार पेठेतही फळगाड्याने अडथळा |

0
6

 अनेक अपघाताचे कारण ठरतयं अतिक्रमण

जत, प्रतिनिधी : जत शहरातील दुकानदारांनी गुहाघर-विजापूर या मुख्य मार्गावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर शहराच्या अंतर्गत भागातही अनेक नागरिक व दुकानदारांनी अतिक्रमण करून मोठमोठी प्रतिष्ठाने बांधली आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी मागणी होत आहे.
जत शहरात कचरा व गाळाने तुंबलेल्या नाल्या, रस्त्याच्या बाजुला पसरलेली कचर्‍याची ढिगारे, रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नगर पालिका स्थापन होऊन ग्रामपंचायत असतेवेळी ज्या समस्या होत्या, त्या नगर पालिका झाल्यानंतरही कायम आहेत. शहरात विविध मार्गाने काळीपिवळी व अन्य प्रवाशी वाहने मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीवर आहेत त्यामुळे रस्ते भरून दिसतात.
जत शहर गुहाघर-विजापूर या राज्यमार्गावर वसले आहे. त्यामुळे शहराची बाजारपेठ याच रस्त्याच्या बाजुला वसली आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुकान गाळे तयार करून दुकाने थाटण्यात आली आहेत. दुकानाची गाळे नालीच्या आतमध्ये असली तरी दुकानातील सामान मात्र रस्त्यावर आणून ठेवले जाते. अनेक दुकानदार आपले सामान रस्त्यावर आणून ठेवतात. मात्र यावर कुठलीही कारवाई होत नाही. दुकानदार दुकानातील सामान रस्त्याच्या बाजूला शेड उभारून लावत आहे. या बाबीमुळे रस्त्यावर सामान लावण्याची दुकानदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक दुकानदारांनी शेड उभे केले आहेत व या शेडचा विस्तार दरवर्षी वाढत चालला आहे. परिणामी मुख्य रस्ता अरूंद होत चालला आहे. सदर अतिक्रमण हटविण्याची हिंमत स्थानिक प्रशासनाने अद्यापही दाखविलेली नाही. तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाप्रमाणेच आता नगरपालिकेचेही प्रशासन तेच काम करीत आहेत. लोकवस्तीत सुध्दा अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. अनेक नागरिकांची स्वच्छतागृहे नालीवर बांधण्यात आली आहेत. परिणामी नाली उपसणे त्रासदायक काम बनले आहे. अतिक्रमणाच्या समस्येमुळे अपघात वाढले आहेत. वाहतुकीची कोंडी होत आहे व शहराचे सौंदर्यही लयास गेले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील नाल्यांचा दोन ते तीन महिन्याकाठी नियमित उपसा होत नाही त्यामुळे नाल्यांमध्य गाळ मोठय़ा प्रमाणावर साचलेला आहे. काही भागात तर वर्ष उलटूनही नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. परिणामी नाल्या गाळ व कचर्‍याने तुडूंब भरल्या आहेत. सांडपाणीही साचलेले आहे. नगरपालिका प्रशासन स्थापन झाल्यानंतर नाल्यांचा उपसा नियमितपणे केला जाईल, अशी अपेक्षा जतवासीयांकडून व्यक्त केली जात होती. मात्र परिस्थितीमध्ये कोणताच फरक पडला नाही. नालीतील सांडपाण्यामध्ये डुकरांचे वास्तव्य ही नित्याचीच बाब बनली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here