अतिक्रमणात सापडलेले रस्ते कधी मोकळे होणार,जत येथील नागरिक त्रस्त : स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

0
22

  • जत,प्रतिनिधी : शहरातील संपूर्ण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून या अतिक्रमणाच्या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अतिक्रमणामुळे येथे अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती. यात मुख्य चौकातील संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा परिस्थिती जैसे-थे झाली असून नागरिक व वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.जत येथील किरकोळ दुकानदार शासकीय जागेवर बसून विविध वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र त्यांना जागेचे पैसे मोजावे लागत आहे. दरमहा तीन ते चार हजार रुपये देऊन आपले दुकान चालवताना ते दिसतात. पान टपऱ्यांमुळे फुटपाथवर चालणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून पानटपऱ्यांची मुख्य चौकातील रस्त्यावर गर्दी केली आहे. यातच विविध रोडवरील दररोज होणारी अवैध प्रवासी वाहने, येथेच थांबविल्या जात असल्याने रस्ताच उरत नाही. या अतिक्रमणाचा त्रास येथील शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.अनेकदा परिवहन मंडळाच्या बसगाडीला उभे राहण्याकरिता जागा नसते. त्यातच बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थी धावपळ करीत असतात. आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडताना विद्यार्थी दिसतात. भाजी विक्री करणारेही तसेच विकणाऱ्यांनी खुल्या जागेत अतिक्रमण केले. त्यामुळे मुख्य मार्गावरील आॅटो,मँक्स चालकाची गर्दी पाहता वाहन काढने कठीण जात आहे. वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतात, मात्र ते नसल्यासारखेच दिसतात. जत येथील संपुर्ण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून यामुळे अपघाताची मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.अतिक्रमणाचा विषय सध्या चर्चेचा ठरत असून अतिक्रमण हटविण्याकडे बांधकाम विभाग नगरपालिका  मात्र झोपाचे सोंग घेऊन आहे. संपुर्ण रस्ता खड्ड्यांचा असून याकडे एकही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता असे समजने कठीण झाले आहे. तेव्हा बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन अतिक्रमण व रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here