जत | ऐन पावसाळ्यात जत तालुका कोरडा ठणठणीत |

0
8

जत,प्रतिनिधी:राज्याच्या कानाकोपर्‍यात पावसाने यावर्षी थैमान मांडले असताना सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात पावसाने दडी मारली असून ऐन पावसाळ्यात येत्या महिन्याभरात अनेक गावांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. तालुक्यात असलेली बोर नदी,ओढे कोरडे ठणठणीत पडले आहेत.दरम्यान येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर जत तालुक्यात दुष्काळ पडण्याची भिती आहे.
जतमध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पुर्व भागातील अनेक गावातील महिला वर्गासह अबालवृध्द पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल भटकत आहेत. पावसाअभावी पिके माना खाली टाकू लागल्यामुळे खरिप हंगाम वाया जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात असून  बळीराजा दुबार पेरणीच्या भितीने हवालदिल  झाला आहे.
जत तालुका हा कायम दुष्काळी तालुका. सन 2013 मध्ये माणवासिय जनतेने दुष्काळाशी मोठा संघर्ष केला आहे. जनावरांच्या चारा छावण्यांवरच गावेच्या गावे वसली होती. त्या दुष्काळी आठवणी ताज्या असताना या वर्षीही जत तालुक्याची दुष्काळाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याची चाहूल लागली आहे. जनता पिण्याच्या पाण्यासाठी रात्रं दिवस वनवन भटकू लागली आहे. पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजरी मका ही पिके माना टाकू लागली आहेत तर कांदा, भुईमुग, ऊस, डाळिंब, द्राक्ष या पिकांच्या पाण्याचा विचार न केलेलाच बरा. नदी,ओढे कोरडे पडले आहेत. अनेक गावात दहावर्षे झाली तरीही भारत निर्माण पेयजल योजनेतून उध्दव तलावातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू करण्यात आलेले नाहीत.जवळपास सर्व गावाच्या भारत निर्माण, पेयजल योजना अपहाराने बंद आहेत.
डफळापूर, कुंभारी,शेगाव गटात म्हैशाळचे पाणी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसत आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या सद्या भेडसावत नसली तरी भविष्यात पाऊस पडला नाही तर परिस्थिती  चिंताजनक होणार हे निश्‍चित आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here