जत,प्रतिनिधी: प्लास्टिक बंदीचा पहिला दिवस राज्यभर चर्चेचा ठरला.जत शहरासह तालुक्यात हा आदेश ढाब्यावर बसविण्यात आला.त्यामुळे प्लॉस्टिक बंदी जतसाठी नव्हतीच असा काहीशी स्थिती होती. शासनाच्या दुसऱ्या अध्यादेशामुळे राज्यभर शिथिलता आल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत.
23 जूनपासून प्लास्टिक बंदीचा अंमल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीस खाद्य विक्रेते, बेकरी आणि पॅकिंग वस्तू असणाऱ्या व्यापाऱ्यांचा विरोध झाला. त्यामुळे शासनाने नव्या अध्यादेशाद्वारे काही जणांना 50 मायक्रॉनपेक्षा जादा जाडीचे प्लास्टिक रिसायकलिंगच्या अटीवर तीन महिन्यांसाठी शिथिलता दिल्याने कारवाई थंडावली आहे. सध्या बाजारात बेकरी, भाजी व फळ विक्रेत्यांकडे पुन्हा कॅरीबॅग दिसत आहेत. सुपर मार्केट, मॉल व किराणा दुकानात कापडी पिशव्यांचा आग्रह धरला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
अशी आहे सवलत…
– दुकानात पूर्वीपासून पॅकिंग स्वरूपात असलेल्या पाव ते एक किलोपर्यंतच्या साहित्यावरचे प्लास्टिकचे आवरण काढण्यास शासनाने तीन महिन्यांची सवलत दिली आहे. यापुढे असे पॅकिंग 50 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी असता कामा नये. प्लास्टिकचे रिसायकलिंग करण्याच्या अटीवर उत्पादनावर उत्पादक, विक्रेत्याचे नाव व प्रदूषण महामंडळाकडे नोंदणी केल्याचा परवाना क्रमांक असणे आवश्यक आहे.