जत, प्रतिनिधी;जत तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील घोटाळ्यामुळे बिले थकलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्जाऊ,हातउसने पैसे काढून कामे केली, नियमाप्रमाणे सर्व करूनही काही बोटावर मोजण्याऐवढ्या लोंकाच्या चुकीमुळे सर्वांना शासन होत आहे. ज्यांनी भष्ट्राचार केला ते मोकाट आहेत. तर ज्यां सामान्य शेतकऱ्यांनी नियमाप्रमाणे कामे केली आहेत. त्यांची बिले मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा धिर सुटत अाहे. गोरख केंगार यांच्या प्रकरणावरून ते समोर आले आहे. दुसरा गोरख केंगार होण्याअगोदर प्रशासनाने शहाणे व्हावे.बेळुंखी (ता. जत) येथील गोरख बजाबा केंगार यांच्या गोठा कामाची तपासणी करून अनुदान देण्याबाबत जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना 7 दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांच्या शेडचे (गोठा) अनुदान रखडल्याने शेतकरी गोरख केंगार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करतील असे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात संपर्क साधला असता मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, केंगार यांच्या कामाची तपासणी करून अनुदानाची रक्कम देण्यास जतच्या गटविकास अधिकारी यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. गोठ्याचे काम झालेले असेल व नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर अनुदानाची रक्कम देणे अनिवार्य आहे. अनुदानास विनाकारण विलंब झाल्यास दोषींवर कडक कारवाई होईल. दरम्यान केंगार यांनी यापूर्वी अनुदानासाठी जिल्हा परिषदेला पत्र देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्या पत्रावरून जिल्हा परिषदेने जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना दीड महिन्यांपूर्वी कळवून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान जत पंचायत समितीच्या मनरेगा घोटाळ्यामुळे गेल्या वर्षापासून कामे तर बंद आहेत. त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांना वर्षभारापुर्वी कामे मंजूर झाली होती. त्यांनी स्वत:हातउसने किंवा कर्जे काढून कामे केली आहेत. पुर्ण कामे केलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली जात नाहीत. अनेक तपासण्या झाल्या आहेत. प्रत्यक्षात ज्याचे काम नियमाप्रमाणे आहे. त्यांना बिले द्यावीत असे आदेश आहेत. मात्र जत पंचायत समितीच्या विचित्र राजकारण व गटविकास अधिकाऱ्यांच्या अडमुठ्या धोरणामुळे सर्वकाही थांबले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा बांध फुटत आहे. घातलेले पैसे,चांगली कामे करूनही मिळत नाही. ज्यांनी भष्ट्राचार केला ते नामानिराळेच आहेत. मात्र ज्या नियमाप्रमाणे कामे केली त्यांनांही भरडले जात आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांचा धिर सुटत असल्याचे गोरख केंगार यांच्या मुळे पुढे आले आहे. प्रशासनाने यांचा गार्भियांने विचार करण्याची आता वेळ आली आहे.