उमदी,वार्ताहर:
जत पूर्व भागातील एक प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालगाव येथील बोरनदी वरती आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा अजून पर्यंत अपूर्ण राहिला आहे.ते अपूर्ण काम पूर्ण करावे अशी मागणी नूतन उपसरपंच लोकप्पा उर्फ बाबू नागोंड यांनी केली आहे.
यावेळी बोलताना उपसरपंच नागोंड म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात सांगली मंडळ पाटबंधारे विभाग मार्फत उपविभागीय लघू पाटबंधारे उपविभाग जत यांच्या मार्फत मंजूर करण्यात आलेला हा हळ्ळी/बालगाव येथील बोरनदी वरती कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभा करण्यात आला आहे. मात्र या बंधाऱ्याचे अजून ही अपूर्ण पद्धतीचा आहे. बंधाऱ्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यास 50 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल याचा विचार करून आराखडा प्रमाणे सर्व कामे पूर्ण करण्यासाठी पाठबंधारे विभागाने प्रयत्न करावे.
बंधाऱ्याकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याला एका शेतकऱ्याने विरोध केल्याने व्यवस्थित रस्ता केलेला नाही तसेच बंधाऱ्याचे हळ्ळी गावाच्या बाजूला बांध बंधस्ती नसल्याने पाणी वाहून गेले आहे. त्याठिकाणी फक्त मलम पट्टी करण्यात आली आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा पाणी जास्त प्रमाणात साठून राहू शकलेले नाही. पाण्याचा फुगवटा व बंधाऱ्याचे धारणा क्षमता,पाण्याचा दाब या सर्वाचा विचार करून संबंधित विभागाने बंधाऱ्याचे अपूर्ण काम त्वरीत पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच नागोंड यांनी दिली .
यावेळी माजी उपसरपंच आप्पासाहेब केंगार गणेश कोळी ,चंदू बिरादार,कांतप्पा बिरूनगी,राजू खवेकर उपस्थित होते.
जत तालुक्यातील हळ्ळी/बालगांव गावालगत बोर नदीवर बांधलेला बंधारा काम व्यवस्थित पुर्ण न झाल्याने अर्धवट राहिल्याने पाणी वाहून गेल्याने कोरडा पडला आहे.