अपमान का बदला… खून?
संस्काराचा विसर ;तरूणाई भरकटण्याची भीती
आजच्या माणसात सहनशीलता कमी व्हायला लागली आहे.लोकसंख्येच्या गर्दीत,वेगाच्या मागे धावणार्या माणसाला पदोपदी अपमानाला सामोरे जावे लागत आहे. जाणत्या– अजाणतेने होणार्या चुका त्याला अपमानाकडे घेऊन जात आहेत.पण हा अपमान सहन करण्याची वृत्ती कमी झाल्याने भांड्याला भांडे लागल्यावर वाजते, तसे तोंडाला तोंड लागून शिवीगाळ, वाट्टेल तसे बोलणे, अशा ठिणग्या पडायला लागतात. कधी कधी त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन मोठा स्फोट होतो. यातून नवीनच काही तरी निपजतं. आजच्या तरुणपिढी विषयी बोलायची सोय राहिलेली नाही. त्यांना अपमान काळात कसं वागावं, याचं शिक्षणचं कुणी देत नाही. आई–वडीलसुद्धा कशाला कुणाचं ऐकून घेतो? हाणायची नाही का थोबाडीत, असे सांगून त्याला भडकावून सोडतात.साहजिकच शाळा–कॉलेजात पोरं शिक्षकांसमक्षच हाणामारी करताना दिसतात. इतकेच काय परीक्षेत बघू दिले नाही, म्हणून शिक्षकांवरच हल्ला करायला मागे पुढे पाहात नाहीत.
आज या मुलांना कुणी समजावून सांगायचं कुणी धाडस करीत नाही. कारण सांगण्यापेक्षा त्याच्या वाट्याला अपमानच येतो.त्यामुळे आजची तरुणपिढी भरकटत चालली आहे.त्यामुळे अशा मुलांना चांगल्या–वाईटाच्या चार गोष्टी सांगायच्या कोणी, असा प्रश्न आहे. चांगली पुस्तके वाचली तर निदान त्यातून तरी काही समजून घेतली असती ही मुले, पण पाठ्यक्रमाची पुस्तकेच न वाचणारी ही पुस्तके कुठली वाचणार? आई–बाप अडाणी,त्यांना काय माहीत वाचनाचा लाभ ?शाळा–कॉलेजमध्येही वाचनालये समृद्ध आहेत. पण तिकडे कुणी फिरकत नाही. आज तर मुलांच्या,युवकांच्या हातात स्मार्टफोन आहे. पाच–दहा हजाराचा स्मार्टफोन घेऊन द्यायला पालकांकडे पैसा आहे,पण एखादे चांगले पुस्तक घेऊन द्यायला या लोकांकडे पैसा नाही. आई–बापांनाही आपल्या मुलाचे हित कशात आहे, हे शोधायला, विचार करायला वेळ नाही. इतकेच काय आपला मुलगा,मुलगी दिवसभर काय करतात, याची फिकीर करायलासुद्धा यांच्याकडे वेळ नाही.त्यामुळे त्यांच्यावर चांगल्या–वाईटाचे संस्कार कसे होणार?
चांगला शिकून–सवरून चांगला ऑफिसर होण्याची स्वप्नं काही मुलं, त्यांचे आई–बाप पाहात असतात. काहींच्या कष्टाला खरेच यश येते. खरे तर आजकाल पैसा महत्त्वाचा नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. आज पैसे कमवायला अक्कल लागत नाही. तसे असते लोक राजकारण्यांचे, सावकारांचे गुलाम म्हणून जगले नसते. छौ.. म्हटले अंगावर जाणारी पिढी आज तयार होत आहे. अशा लोकांकडे कुठे स्वत:ची अक्कल आहे? ऐशआरामात राहायला,चैनी करायला मिळत असेल तर आणखी काय हवंय? त्यामुळे खरे तर समाजातली शांतता भंग झाली आहे, त्याचे काय? हाणामारी,खून केल्यावर काहींच्या घरी पैसा पोहोच होत आहे.यात काही दिवस सुखात जातात. आजच्या पिढीच्यादृष्टीने हे सुखच! कारण फारसे माणसे मारायला आता फारसे कष्ट पडतच नाहीत. बिगरपरवाना हत्यारांचा बाजार वाढला आहे.तस्करी वाढली आहे.परवाच सांगलीच्या पोलिसांनी 26 पिस्तूलं जप्त केली. उत्तर प्रदेशात जाऊन तिथला बेकायदा पिस्तूल निर्मितीचा कारखाना उदवस्त केला. काय चाललंय काय समाजात? याच्याने कुणाच्या डोक्यात शांती वसणार आहे? शिवाय किती दिवस चालणार हे? कुणा विरोधी गुंडांच्या तडाक्यात किंवा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्येच जाणार. हे असले आयुष्य जगून हा बहुमोल माणसाचा जीव परत जाणार? माणसात आणि पशु–पक्ष्यात फरक तो काय मग?
आजकाल संस्कार महत्त्वाचे आहेत. अर्थात या संस्कारांची शिकवण घरातून, शाळेतून मिळते. पण ही संस्कारगृहे राहिलेली नाहीत. त्यामुळेच एक छोटा अपमान कुणाच्या आयुष्याला अधोगतीकडे नेतो, कुणाला प्रगतीकडे. ज्याने अपमान गिळला, ज्याने तो विसरला, समोरच्याला माफ केला तो साहजिकच चांगल्या ठिकाणीच पोहचेल. इथे कुणाची उदाहरणे द्यायची नाहीत.पण साधासोपा व्यवहार आहे.जो दुसर्याला माफ करतो,त्याचं चित्त स्थीर असणार आहे.त्याच्यावर,त्याच्या मनावर त्या अपमानाचा परिणाम झाला नाही. मात्र ज्याने अपमान मनावर घेतला,त्याचे आयुष्य मात्र उदवस्त होणार! कारण तो अपमान आपल्या पाठीवरून वाहून नेत असतो. समोरच्याला माफ करून पुढे जाता,तेव्हा किंवा त्याचक्षणी पाठीवरून त्याला उतरवता. आणि तेव्हाच माणूस जीवनात पुढे सरकू शकतो.
मच्छिंद्र ऐनापुरे,जत