महिलाची बदनामी करणारी पत्रे आल्याने खळबंळ
कासिलिंगवाडीतील प्रकार : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण
जत, (प्रतिनिधी):तालुक्यातल्या कासलिंगवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिलाच्या नावे बदनामीकारक मजकूर असलेली पत्रे घरा-घरात पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी जत पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास लवकरच गजाआड करू मात्र गावाने शांतता राखावी असे आवाहन पोलिस निरिक्षक राजु तासिलदार यांनी केले.
गावामधील राजकीय व्यक्तींनी केलेल्या मनरेगा घोटाळा व काही महिलाची बदनामी करणारी पत्रे महिलांच्या पतीच्या नावाने पाठविण्यात आली आहेत. ही पत्रे पोस्टाने आली असून जसजशी ही पत्रे वाचली गेली तसतसे गावात संतापाची लाट पसरली. मात्र गावातल्या काही लोकांनी हा प्रश्न कायदेशीर पद्धतीने सोडवण्याचा सल्ला दिल्याने हे प्रकरण पोलिसांत गेले. जतचे पोलीस निरीक्षक ताशिलदार यांनी तातडीने गावातील प्रमुख लोकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.
असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना शोधून तातडीने अटक करू, असे आश्वासन ताशिलदार यांनी दिले. त्यामुळे गावात शांतता निर्माण होण्यास मदत झाली असून तरीही गावात बंदोबस्त देण्यात आला आहे. बदनामी करणारी ही पत्रे जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) येथून पोस्ट करण्यात आली आहेत.शिवाय ही पत्रे एकाच राजकीय पक्षाकडील लोकांच्या नावे आली आहेत.त्यामुळे या प्रकरणास गंभीर व राजकीय वळण लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रे आल्याने गावात खळबळ उडाली आहे.बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि राजकीय तेढ वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.