जत,संकेत टाइम्स : वृद्धापकाळात वाऱ्यावर सोडून देणाऱ्या दोन लेकींनी जन्मदात्या आईला पाच हजारांची पोटगी द्यावी, असे आदेश जत प्रांताधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अध्ययासी अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला आहे.श्रीमती रखमाबाई मारुती चव्हाण (वय ६०, वायफळ, ता. जत) या माऊलीने लेकी नंदा दिलीप जाधव (वय ४०, बागेवाडी, ता. जत), वंदना प्रवीण सुळे (वय ४२, सावंतपूर, ता. पलूस) यांच्याविरुद्ध प्रातांधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती.
त्यानुसार माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियम २००७ च्या तरतुदीनुसार सुनावणी होवून हा आदेश देण्यात आला. दरम्यान, या आदेशाला जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे श्रीमती जाधव यांना अपील केले होते. या कायद्यात पाल्यास अपिलाची कोणताही तरतूद नसल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला.
अधिक माहिती अशी, की श्रीमती रखमाबाई यांच्या पतीचे सन १९९९ मध्ये निधन झाले. त्यांच्या या दोन्ही लेकी सासरी नांदत आहेत.
पतीच्या पश्चात लेकींना शेत जमिनीमध्ये हिस्सा घेत आईस वाऱ्यावर सोडले. तिच्या देखभालाची जबाबदारी नाकारली. त्यामुळे रखमाबाई आपल्या माहेरी राहण्यास गेल्या. त्यानंतर ६ जानेवारी २०२१ रोजी जत पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला.त्यावेळी श्रीमती जाधव यांनी ऊस बिल आल्यानंतर वीस हजार रुपये आईला देत आहे, असा जबाबात पोलिसांत दिला. तथापि त्यानंतर आईस एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाकडे पीडित आईने दाद मागितली.
प्रातांधिकाऱ्यांनी श्रीमती जाधव यांनी तीन, तर श्रीमती सुळे यांनी दोन हजार असा दोघींनी मिळून प्रतीमहा पाच हजार पोटगी (निर्वाह भत्ता) द्यावी. महिन्याच्या पाच तारखेला बँक खात्यावर ही रक्कम जमा करावी. तसेच बागेवाडी येथील १.१० हेक्टर शेतजमीन वहिवाटीसाठी श्रीमती रखमाबाई यांना द्यावी, असे आदेश नमूद करण्यात आले आहे.