सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या सोसायटी अ गटातील महाविकास आघाडीचे आमदार विक्रमसिंह सांवत व भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनेल मधून माजी सभापती तथा रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रकाश जमदाडे यांच्या तुल्यबळ लढत होत आहे.कॉग्रेस अंतर्गत बंडाळी झाली व राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्यास जमदाडे यांचा विजय होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या जत तालुक्यात निर्माण झाली आहे. या हायहोल्टेज लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जतचे भिष्माचार्य नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाचे पँनेल लावण्यापासून शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार निवडून यावे यासाठी व्यूहरचना रचत आपला अनुभव पणाला लावला आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजीचा फटका आमदार सावंत यांना बसू शकतो. यामुळे माजी सभापती प्रकाश जमदाडे हे निवडणुकीत बाजी मारणार अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
या अटीतटीची लढतीत माजी आमदार विलासराव जगताप, तालुक्यातील काही मातब्बर नेत्यांनी छुप्या पद्धतीने प्रकाश जमदाडे यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
सहकार संस्था गटातून तालुक्यातून ८५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विजयाचा जादुई आकडा गाठण्यासाठी सावंत व जमदाडे यांच्यात कसोटी आहे.जनतेने डोक्यावर घेत आमदार विक्रमसिंह सांवत यांना गत विधानसभा निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने आमदार विक्रमसिंह सांवत यांना निवडून दिले होते. जनतेचा आमदार म्हणून त्यांनी गेल्या दोन वर्षापासून काम केले आहे.
दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी सहभागी होऊन प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रकाश जमदाडे यांनी नेहमीच निभावली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत अंतर्गत सत्तासंघर्ष कलहाचा परिणाम बँकेच्या निकालावर होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याचबरोबर इतर मागासवर्गीय गटात माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील व माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या लढती कडे लक्ष लागले आहे. या गटातील उमेदवारांना जिल्ह्यातील दोन हजार २१९ मतदारांचे मतदान आहे. दोन्ही गटातील उमेदवारांनी मतदारांपर्यंत प्रत्यक्षात भेटीगाठीद्वारे व आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.