तासगाव : गेल्या 15 दिवसांपासून शांततेत सुरू असणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. विटा आगाराच्या विटा – सांगली या बसवर सोमवारी सायंकाळी अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये बसचा चालक किरकोळ जखमी झाला. तासगाव – सांगली रोडवर कवठेएकंदजवळ हा प्रकार घडला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लालपरीची चाके थांबली आहेत. गेल्या 15 दिवसांत ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मात्र नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, अशी भूमिका घेत एस. टी. कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान, सरकारकडून आंदोलनात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. त्यातच सांगली जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रवाशांची सोय करतोय, या गोंडस नावाखाली थोड्याफार कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही मार्गावर बससेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगीत तेल ओतल्याचा प्रकार झाला आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे एस. टी. कर्मचारी संतापले आहेत.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याने कर्मचारी आक्रमक बनले आहेत. शांततेत सुरू असणारे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याने कर्मचाऱ्यांचाही संयम सुटत आहे. आज (सोमवारी) सायंकाळी विटा आगाराची विटा – सांगली (एम. एच. 20, डी. 9152) ही बस पोलीस बंदोबस्तात संगलीकडे निघाली होती.
या बसवर कवठेएकंदजवळ अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये बसच्या पुढील बाजूची व खिडकीची काच फुटली आहे. या दगडफेकीत बसचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यात एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे.