जत,संकेत टाइम्स : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे महासंकट, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन वर्ष महापूर, रायगड येथील चक्रीवादळाने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी या काळात केलेली मदत लाखमोलाची आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत सांगली जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या वतीने तुकाराम बाबा महाराज यांना कोरोना योद्धा रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सांगली जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार दिनकर पाटील यांनी तुकाराम बाबा महाराज यांना हा पुरस्कार जाहीर केला होता. जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी तुकाराम बाबा महाराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार दिनकर पाटील, सचिन नितीन शिंदे, उपाध्यक्ष किरण जगदाळे, अजित भोसले, अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन जाधव, नगरसेवक अजिंक्य पाटील, सागर घोडके,महाराष्ट्र कब्बडी असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर , विशाल साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार दिनकर पाटील यांनी तुकाराम बाबांच्या अविरत समाजकार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा तुकाराम बाबा महाराज यांनी प्रत्यक्ष कृतीतून जपला आहे. कोरोना काळात दहा हजाराहून अधिक कुटूंबियांना जिवनावश्यक किट, ५० हजाराहून अधिक कुटूंबियांना घरपोच भाजीपाला वाटप, ५० हजाराहून अधिक जणांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप बाबांनी केले.
महापूर काळातही बाबा मदत नव्हे कर्तव्य म्हणत सांगली व कोल्हापूर महापूर प्रसंगात सांगलीकराच्या मदतीला धावून आले. अन्नदान, पाण्याच्या बाटल्या इतकेच नव्हे तर जनावरांसाठी चारा घेवून आले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेत अनेक हात महापुराप्रसंगी सांगलीकरांच्या मदतीला धावून आले. तुकाराम बाबा महाराज यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे घोडके व पाटील यांनी आवर्जून सांगितले.
■ मदत नव्हे कर्तव्य- तुकाराम बाबामागील चार वर्षांपासून आपण मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून अहोरात्र मदत करण्यासाठी धावत आहोत. २०१८ ला दुष्काळ त्यानंतर कोरोना, महापूर काळात जमेल ती मदत केली. सांगलीकरांनी आज माझा पुरस्कार देवून जो सन्मान केला आहे त्याचा मनस्वी आनंद होत आहे. संकटसमयी माणसाने माणसाला मदत करावी यासाठीच आपण श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना स्थापन केल्याचे पुरस्काराला उत्तर देताना तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
सांगली जिल्हा कब्बडी असोसिएशन च्या वतीने तुकाराम बाबा महाराज यांना कोरोना योद्धा रत्न पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.