सांगली : राज्य शासनाकडील दि. २० जानेवारी २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू ठेवणे अगर बंद ठेवण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. सांगली जिल्ह्यातील दि. 21 जानेवारी 2022 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा कोविड-19 च्या RTPCR व RAT तपासणीचा पॉझीटीव्हीटी दर 23.99 टक्के इतका जास्त आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत व कोविड पॉझीटीव्हीटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने व वेगाने वाढ होत आहे.
या परिस्थीतीचे अवलोकन करून जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी खालील बाबी वगळता सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळा दि. 31 जानेवारी 2022 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
(१) विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम.
(२) प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज.
(३) शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, किंवा इतर तत्सम प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम बंद ठेवण्यात आलेल्या 1 ली ते 12 वी च्या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली व शिक्षण विभाग, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कार्यप्रणालीबाबत स्वतंत्र सूचना/ निर्देश निर्गमित करावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.